आता अवघ्या दहा मिनिटांत मिळणार आधार कार्ड, ठाण्यात राज्यातील सर्वात मोठ्या आधार केंद्राला सुरुवात
ठाण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठे आधार केंद्र सुरू करण्यात आले असून, आता अवघ्या दहा मिनिटांत आधार कार्ड मिळणे शक्य होणार आहे.
ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ठाणेकरांना अवघ्या दहा मिनिटांत आधार कार्ड (Aadhaar card) मिळणार आहे. राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र (Aadhaar Center) ठाण्याच्या (thane) लेकसिटी मॉलमध्ये सुरू करण्यात आले आहे. आज आधार हा व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. शाळेतील प्रवेशापासून ते ओळखपत्रापर्यंत आणि बँकेत खाते सुरू करण्यासाठी ते रेशन दुकानात धान्य मिळेपर्यंत सर्वच ठिकाणी आधार सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड हा व्यक्तीच्या ओळखीचा मुख्य पुरावा आहे. प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाते. मात्र अनेकदा आधार कार्ड काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लाकतो. आधार कार्डमध्ये साधा बदल करायचा जरी म्हटले तरी देखील कमीत कमी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. तसेच अद्यापही मोठ्या संख्येने आधार केंद्रे नसल्याने आधारमध्ये बदल करण्यासाठी रांगा लावाव्या लागतात.
राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र
हीच समस्या लक्षात घेऊन ठाण्यात आता राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र उभारण्यात आले आहे. ठाण्यातील लेकसिटी मॉलमध्ये हे आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. इथे आधार कार्डसाठी लांबच लांब रांग लावण्याची गरज नाही तसेच अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असल्याने आधारधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्याच्या या आधार केंद्रात नवीन आधारकार्ड काढणे, आधार कार्डमधील दुरुस्ती, पत्ता बदलने, आधार आणि मोबाईल लिंकिग यासारखी आधारशी संबंधित कामे केली जातात.
16 काउंटरच्या माध्यमातून काम
हे राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र आहे. इथे 16 काउंटरच्या माध्यमातून ही कामे केली जातात. सध्याच्या घडीला या केंद्रात दररोज 200 ते 250 आधारशी संबंधित कामे केली जातात. दररोज एक हजार नवे आधार कार्ड तयार करण्याची या केंद्राची क्षमता आहे. आधार केंद्र आपल्या दारी ही केंद्र सरकारची योजना असून, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळून देण्यासाठीच हे आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. सरकारच्या धोरणानुसार दर पाच वर्षांनी आधारचे नुतनीकरण करावे लागणार असल्याने या केंद्राचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.