बच्चे कंपनीच्या किल्ल्यावर कोब्रा नागाचा कब्जा, फणा काढताच बच्चे कंपनीने ठोकली धूम
या किल्ल्याच्या खालच्या बाजूला बिळासारख्या जागेत कोब्रा नाग शिरला होता.
कल्याण : दिवाळीच्या सणानिमित्ताने बच्चे कंपनीकडून घराच्या अंगणात मातीचा किल्ला उभारण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. किल्ला उभारणीसाठी बच्चे कंपनी दिवाळी अगोदर मेहनत करून किल्ला उभारतात. त्यावर छत्रपती शिवरायांसह मावळ्यांचे लहान पुतळे ठेवण्यात येतात. एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याची कलाकृती उभारतात. मात्र अशाच एका बच्चे कंपनीच्या किल्ल्यावर फणा काढून कोब्रा नागाने कब्जा केला.
ही घटना कल्याण पश्चिम भागातील सापड गावात घडली आहे. सापड गावात मढवी कुटुंब राहतात. त्यांच्या कुटुंबातील चार ते पाच मुलांनी मातीचा किल्ला घराच्या अंगणात उभारला आहे.
या किल्ल्याच्या खालच्या बाजूला बिळासारख्या जागेत कोब्रा नाग शिरला होता. मात्र तोपर्यंत ही बच्चे कंपनी खेळण्यात गुंग होती. काही वेळाने बच्चे कंपनी किल्ल्यावर संध्याकाळची रोषणाई करण्यासाठी तयारी करत होती. तेवढ्यात हा कोब्रा नाग अचानक किल्ल्यात दिसला.
या कोब्रा नागाला पाहून मढवी कुटुबातील बच्चे कंपनी घाबरली. धूम ठोकत किल्ल्यात नाग असल्याची माहिती वडिलांनी दिली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी ही माहिती सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र हितेश करंजळकर याने रेस्क्यू करत शिताफीने पकडून कोब्रा पिशवीत बंद केला.
हा कोब्रा नाग इंडियन कोब्रा जातीचा आहे. साडेतीन फूट असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली. या कोब्रा नागाला कल्याण वन अधिकाऱ्याच्या परवानगीने जंगलात सोडून जीवदान दिल्याची माहितीही सर्पमित्राने दिली.
दुसरीकडे ऐन दिवाळीच्या दिवशीच मढवी कुटुंबातील बच्चे कंपनीने उभारलेल्या किल्ल्यावर या कोब्रा नागाने कब्जा केल्याची चर्चा आता गावात रंगली आहे.