Eknath Shinde : ठाण्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सत्काराचे आयोजन
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रुपात मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
ठाणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रुपात मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. या नागरी सत्कारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचेही आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी, 9 जुलै 2022 रोजी ठाण्यातील (thane) आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयात झालेल्या विविध संस्थांच्या नियोजन बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सत्काराची घोषणा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय (Political) प्रवास एक साधा शिवसैनिक म्हणून सुरू केला. मात्र त्यानंतर ते शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार, मंत्री अशा एक एक यशाच्या पायऱ्या चढत गेले. आज ते मुख्यमंत्री झाले आहेत. हा ठाण्यासाठी बहुमान आहे. त्यामुळे शिंदे यांच्या सत्काराचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रगट मुलाखतीचेही आयोजन
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनवून ठाण्याला ऐतिहासिक बहुमान मिळवून दिला आहे. याबद्दल ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील सेवाभावी संस्थांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात ठरवले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागरी गौरव समिती’तर्फे केले जाणार आहे. या समितीत ठाण्यातील विविध संस्थांचा समावेश आहे. या समितीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी 89765 09486 किंवा 90046 74715 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन या गौरव समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे.
‘हा बाळासाहेबांचा मेळावा’
दरम्यान आज पुंढरपुरात देखील शिंदे गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मेळावा आहे. शिवसैनिकांचा हा मेळावा आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा तेजस्वी विचार पुढे नेणारा हा मेळावा आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आज मी मुख्यमंत्री म्हणून उभा आहे, तो आनंद दीघे यांच्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून शिवसेना वाढवल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.