इन्स्टाग्रामवर मैत्री, जवळीक वाढताच अपहरण, भिवंडीच्या फ्लॅमध्ये मुलीला कोंडलं, पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने 13 वर्षीय मुलीवर इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर आरोपीने तिला पळवून नेत भिवंडीत एका फ्लॅटमध्ये कोंडलं.
डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली गेल्या आठवड्यात एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली होती. 30 पेक्षा जास्त नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच डोंबिवलीत पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने 13 वर्षीय मुलीवर इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर आरोपीने तिला पळवून नेत भिवंडीत एका फ्लॅटमध्ये कोंडलं होतं. अखेर डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला बेड्या ठोकत अल्पवयीन मुलीची सुखरुप सुटका केली.
पीडितेच्या कुटुबियांची पोलीस ठाण्यात धाव
पीडित मुलगी 20 सप्टेंबरला क्लाससाठी घराबाहेर पडली होती. पण ती नंतर घरी परतलीच नाही. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. पण मुलीचा पत्ताच लागत नव्हता. अखेर पीडितेच्या कुटुंबियांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली.
पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पोलिसांना तपासादरम्यान सूत्रांकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. अक्षय महाडिक नावाच्या व्यक्तीनेच पीडितेचं अपहरण केलं, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत अक्षय महाडिक या तरुणाला ठाण्यातून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने पीडितेला त्याच्या भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं होतं. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी जावून पीडितेला ताब्यात घेतलं. त्यानंतर या मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल
आरोपीच्या विरोधात याप्रकरणी अपहरण विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 13 वर्षीय तक्रारदार मुलीशी आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून या मुलीशी जवळीक साधल्यानंतर आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. आरोपी अक्षय महाडिक हा सीसीटीव्ही सिस्टीम, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असल्याने तो सोशल मिडिया माध्यमांमध्येही तरबेज आहे. त्यामुळेच त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी जवळीक साधली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, फ्लाईट लेफ्टनंटला अटक
दुसरीकडे तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या रेडफिल्डमधील इंडियन एअर फोर्स कॉलेजमधील फ्लाईट लेफ्टनंटला सहकारी महिला अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या अधिकाऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून सध्या तो उडुमालाईपेट कारागृहात आहे. कोईम्बतूर पोलिसांनी पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
कोईम्बतूरच्या रेडफिल्डमधील इंडियन एअर फोर्सच्या महाविद्यालयीन वसतिगृहात राहणाऱ्या 29 वर्षीय महिला अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिन्यात महाविद्यालयात तीस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण सुरू केले होते. 10 सप्टेंबर रोजी खेळताना तिला दुखापत झाली होती. त्यामुळे औषध घेऊन ती आपल्या खोलीत झोपायला गेली. मात्र, जेव्हा ती रात्री उठली तेव्हा तिला आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
हेही वाचा :
मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाच्या आमिषाने पुण्यात तरुणीची लाखोंना फसवणूक
मूल होत नाही म्हणून बायकोला मित्रासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी, नगरमध्ये पतीला अटक