VIDEO | उल्हासनगरात दारूसाठी पैसे मागत गावगुंडांचा हैदोस; पोलिसांनी त्याच परिसरातून काढली गावगुंडांची ‘वरात’
याबाबत पोपटानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासातच गुरुमित सिंग लबाना, बॉबी सिंग आणि आयलो सिंग या तिघांना बेड्या ठोकल्या. यानंतर या तिघांची परिसरात असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी थेट त्यांच्याच परिसरात त्यांची 'वरात' काढली.
उल्हासनगर : दारूसाठी पैसे मागत गावगुंडांनी परिसरात हैदोस घातल्याची घटना शुक्रवारी रात्री उल्हासनगरात घडली होती. या आरोपींना काही तासातच बेड्या ठोकत पोलिसांनी थेट त्यांच्याच परिसरातून त्यांची ‘वरात’ काढली. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांच्या या ‘दबंग’गिरीचं सध्या मोठं कौतुक होतंय. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन परिसरात शुक्रवारी रात्री गुरुमित सिंग लबाना, बॉबी सिंग आणि आयलो सिंग या तीन गावगुंडांनी हैदोस घातला होता.
दारु पिण्यासाठी मागत होते पैसे
या परिसरातील केबल ऑपरेटर प्रेम पोपटानी यांचा मुलगा प्रवीण यांच्याकडे दारू पिण्यासाठी या तिघांनी पैसे मागितले. मात्र प्रवीणने त्यांना विरोध करताच प्रवीणसह त्याचे वडील प्रेम पोपटानींसह हिरो पोपटानी, चांदनी पोपटानी, रवी पोपटानी, कोमल पोपटानी यांना या तिघांनी मारहाण केली. त्यानंतर परिसरातील दुकानदार आणि येणाऱ्या जाणाऱ्या अनेकांना अडवून त्यांना मारहाण आणि धक्काबुक्की केली. हा सगळा प्रकार या परिसरातल्या सीसीटीव्हीतही कैद झाला. हे गावगुंड परिसरात हैदोस घालत असताना प्रेम पोपटानी, प्रवीण पोपटानी आणि हिरो पोपटानी या तिघांनी त्यांचा प्रतिकार करत प्रत्युत्तर दिलं.
पोलिसांकडून गुंडांची वरात
याबाबत पोपटानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासातच गुरुमित सिंग लबाना, बॉबी सिंग आणि आयलो सिंग या तिघांना बेड्या ठोकल्या. यानंतर या तिघांची परिसरात असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी थेट त्यांच्याच परिसरात त्यांची ‘वरात’ काढली. पोलिसांच्या या ‘दबंग’गिरीचं नागरिकांनीही कौतुक केलं. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी प्रेम पोपटानी, प्रवीण पोपटानी आणि हिरो पोपटानी यांच्याही विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. तर दोन्ही गुन्ह्यात मिळून एकूण 5 ते 6 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
पोलिसांच्या दबंगगिरीचे नागरिकांकडून कौतुक
दरम्यान, गुरुमित सिंग लबाना हा गावगुंड असून तो वारंवार या भागात नागरिकांना त्रास देत असतो, त्यामुळे त्याला तडीपार करून या भागातली त्याची दहशत संपवण्याची मागणी तक्रारदार प्रेम पोपटानी यांनी केली आहे. उल्हासनगर शहरात अशाच पद्धतीने अनेक गावगुंडांनी हैदोस घातल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने पोलिसांनी आरोपींची ‘वरात’ काढत केलेली ‘दबंग’गिरी उल्हासनगरवासीयांना पहिल्यांदाच पहायला मिळाली. त्यामुळे यापुढे दादागिरी करताना आणि सर्वसामान्यांना नाहक त्रास देताना गुंडांना ही पोलिसांची दबंगगिरी नक्कीच लक्षात राहील. (Police arrested the goons for demanding money for liquor)
इतर बातम्या
बायकोला मारझोड करणं कितपत योग्य? देशभरातल्या धक्कादायक सर्व्हेक्षणची जोरदार चर्चा