भिवंडीत राजकारण तापलं, पालिका विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीला नगरविकास विभागाची स्थगिती
भिवंडी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदावरुन राजकारण तापलंय.
ठाणे : भिवंडी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदावरुन राजकारण तापलंय. सत्तेच्या जोरावर विरोधी पक्षनेते पदी बंडखोर काँग्रेस गटाचे मतलुब सरदार यांची नियुक्तीची घोषणा महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी 22 जानेवारी रोजीच्या ऑनलाईन महासभेत केली. त्याला काँग्रेसचे नगरसेवक माजी महापौर जावेद दळवी यांनी शासन दरबारी हरकत घेतली. यानंतर नगरविकास मंत्रालयाने विरोधीपक्ष नेते पदाच्या नियुक्तीस स्थगिती दिली आहे (Politics in Bhiwandi over appointment of opposition leader of Corporation).
भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. काँग्रेसच्या 18 नगरसेवकांच्या मदतीने कोणार्क विकास आघाडीने महापौर पदाची निवडणूक जिंकत महानगरपालिकेवर सत्ता काबीज केली. तेव्हापासून भिवंडी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या बंडखोर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकारण तापले. त्यातच येत्या दीड वर्षात महापालिका निवडणूकीस सामोरे जावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
थेट राज्याचे नगरविकास मंत्र्यांकडे तक्रारीनंतर नियुक्ती रद्द
महापौर प्रतिभा पाटील यांनी भिवंडी महापालिकेच्या विरोध पक्षनेते पदी बंडखोर काँग्रेसचे नगरसेवक मतलुब अफजल खान उर्फ मतलूब सरदार यांची नियुक्ती 22 जानेवारी रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत केली. मतलूब सरदार यांच्या नियुक्तीविरोधात काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी थेट राज्याचे नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
महापौरांनी पुन्हा विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्याची टावरेंची मागणी
या तक्रारीची दखल घेत नगर विकास मंत्र्यांनी महापालिकेत महापौरांनी महासभेत केलेली मतलूब खान यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीस स्थगिती दिली. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी देखील ही नियुक्ती स्थगित केल्याचे निर्देश प्रशासनासह खान यांना दिले. 22 जानेवारी रोजी झालेली महासभा रद्द केल्याने त्यासभेत झालेले इतर विषय रद्द केले, मग विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीचा विषय कसा मंजूर होऊ शकतो यावर आपण आक्षेप घेतला होता. आता महापौरांनी पुन्हा विरोधी पक्षनेते पद जे आमच्याकडे होते ते पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी केली.
हेही वाचा :
बिनविरोध निवडून येणार म्हणून शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार, तिघांना अटक
भिवंडीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार, नागरिकांचा रस्त्यावर उतरुन संताप
व्हिडीओ पाहा :
Politics in Bhiwandi over appointment of opposition leader of Corporation