मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत ‘पारू’ आणि ‘देवदास’, हे तर इम्रान हाश्मींचे विचार; प्रकाश महाजन यांचा घणाघाती हल्ला
आम्ही भोंग्याविरोधातही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. कितीही नोटीसा बजावा, कारवाई करा, आम्ही आंदोलन करणारच आहोत. आमचा प्रार्थनेला विरोध नाही. पण जे अजाण भोंग्यांमधून येतात ते आम्ही ऐकायचे? असा सवालही त्यांनी केला.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत घडलेल्या मुकाप्रकरणावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत पारू आणि देवदास सिनेमे पाहायला मिळाले. हे कसले हिंदुत्वाचे विचार? हे तर इम्रान हाश्मीचे विचार आहेत, अशी घणाघाती टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा देण्याची मागणीही केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यांच्या रॅलीत तर पारू आणि देवदास सिनेमा पाहिला. हे का त्यांचे हिंदुत्वाचे विचार? हे तर इम्रान हाश्मीचे विचार आहेत. यांचा काय हिंदुत्वाशी संबंध? असा प्रकाश महाजन यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून का दूर गेले हे सर्वांना माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे हेच हिंदूचे एकमेव नेते आहेत. त्यांचे भाषण झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. कमीत कमी कोणाचा तरी त्यांना धाक आहे, असं सांगतानाच इतके दिवस तुम्हाला माहीमचा दर्गा का दिसला नाही? संभाजीनगरमध्ये तुम्ही आम्हाला अडवलं. आम्ही संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण तुम्ही अडवला. आम्ही शासनाच्या निर्णयाच्या बाजूने आहोत. म्हणूच मोर्चा काढला, असंसांगतानाच राज ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच हिंदुत्व सुरक्षित वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे देशाची आणि महाराष्ट्राची धुरा द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
अतिक्रमणावर कारवाई करा
ज्ञानव्यापी मंदिरात देखील अतिक्रमणच झाले आहे. मथुरा येथील कृष्ण मंदिरात मशीद आहे. तेही अतिक्रमणच आहे. त्यावरही कारवाई केली पाहिजे. तिथली मशीद पाडली पाहिजे. हे जर करायचं असेल तर देशाचं नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडेच दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
सूडाचे राजकारण सुरूय
राज ठाकरे हे स्वतःच स्वत:ची टीम आहेत. ते कुणाचीही बी टीम नाहीत. असे असते तर ते शिवसेनेतूनच बाहेर पडले नसते. आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या असा आग्रह करण्यासाठी शिवतीर्थावर अनेकजण चकरा मारत असतात, असं ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसापासून सूडाचे राजकारण चालू आहे. त्यामुळे निवडणुका घ्या म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगत आहोत. राज ठाकरे आता तुम्ही महाराष्ट्रकडे लक्ष द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.
संजय राऊत करमणूक
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत म्हणजे एक्सपायरी डेट औषध आहेत. राऊत हे करमणूक आहेत. त्यांचा जास्त विचार करायचा नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावच लागतं. कारण तुम्ही कामच तशी केली आहेत. इच्छा असेल तर सांगा आम्ही नाही घेणार उद्धव ठाकरे यांचं नाव, असंही ते म्हणाले.