अंबरनाथच्या कचराकोंडीवरून शिवसेना-भाजप आक्रमक! कचरा न उचलल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
अंबरनाथ शहरात पालिकेनं आतापर्यंत तीन वेळा मोठ्या सोसायट्यांमधील कचरा उचलणं बंद केलं होता. मात्र दरवेळी राजकीय पक्षांच्या मध्यस्थीमुळे पालिकेला कचरा उचलणं भाग पडलं. मात्र सोसायट्यांना किती वेळा मुदत वाढवून द्यायची? आणि तरीसुद्धा सोसायट्या पालिकेनं घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? हा खरा प्रश्न आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील दिवसाला 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचा कचरा 30 जानेवारीपासून पुन्हा उचलणं बंद करण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र याविरोधात शिवसेना(Shivsena) आणि भाजप(BJP)नं आक्रमक भूमिका घेतली असून कचरा उचलणं बंद केलं, तर थेट रस्त्यावर उतरण्याचा आणि पालिकेवर धडक देण्याचा इशारा या दोन्ही पक्षांनी दिलाय. त्यामुळं आता कचरा प्रश्नावर पालिका काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंबरनाथ पालिकेनं शहरातील सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःची स्वतः लावण्याचे आदेश दिले होते. याबाबत मागील दोन ते तीन वर्षांपासून तब्बल पाच वेळा शहरातील सोसायट्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही सोसायट्यांनी कचऱ्याचं वर्गीकरण सुरू न केल्यानं पालिकेनं जुलै 2021 मध्ये शहरातील दिवसाला 100 किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणाऱ्या 81 मोठ्या आणि 170 छोट्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःची स्वतः लावावी, अशी अंतिम नोटीस दिली होती. (Shiv Sena-BJP angry over Ambernath garbage, A warning to both parties to agitate)
मात्र तरीही या आदेशाची अंमलबजावणी सोसायट्या करत नसल्यानं सप्टेंबर 2021 मध्ये पालिकेनं या सोसायट्यांचा कचरा उचलणं बंद केलं होतं. मात्र त्यावेळी सोसायट्यांनी पालिकेकडे काही दिवसांची शेवटची मुदत मागितली होती. त्यानंतर 3 महिन्यांची मुदत देऊन पालिकेनं डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा मोठ्या सोसायट्यांमधला ओला सुका असा एकत्र असलेला कचरा उचलणं बंद केलं. मात्र त्यावेळी पुन्हा एकदा शहरातील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळं 26 जानेवारीपर्यंत अखेरची मुदत देत असल्याचं मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी जाहीर केलं. आता 30 जानेवारीपासून पुन्हा एकदा ओला-सुका असा एकत्र असलेला कचरा उचलणं बंद करणार असल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळं शहरात पुन्हा एकदा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
…तर थेट पालिकेवर धडक देऊ, शिवसेनेचा इशारा
दरम्यान, अंबरनाथ शहरात निर्माण होणाऱ्या या संभाव्य कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपनं पालिकेला थेट इशारा दिला आहे. पालिकेनं शहरातला कचरा उचलला नाही, तर थेट पालिकेवर धडक देऊ, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे. अंबरनाथ पालिकेचा चिखलोलीच्या सर्व्हे क्रमांक 132 वर गांडूळ खत प्रकल्प आहे. याशिवाय शहरात 14 ठिकाणी पालिकेनं कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले होते. हे सगळे प्रकल्प सुरू आहेत का? असा सवालही अरविंद वाळेकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच आधी स्वतःचे प्रकल्प चालवून दाखवा आणि मग लोकांना शहाणपणा शिकवा असं म्हणत त्यांनी पालिकेला फटकारलं आहे. तर पालिकेनं स्वतः कचरा न उचलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 6 वर्षांपासून ज्या ठेकेदाराला कचऱ्याचं काम दिलं आहे, तो ठेकेदार कराराप्रमाणे काम करतोय का? हेदेखील पाहावं, असं भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी म्हटलं आहे. तसंच पालिकेनं जर पुन्हा एकदा कचरा उचलणं बंद केलं आणि शहरात कचराप्रश्न निर्माण झाला, तर भाजपकडून जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल, असा इशारा भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी अंबरनाथ पालिका प्रशासनाला दिला आहे.
पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
अंबरनाथ शहरात पालिकेनं आतापर्यंत तीन वेळा मोठ्या सोसायट्यांमधील कचरा उचलणं बंद केलं होता. मात्र दरवेळी राजकीय पक्षांच्या मध्यस्थीमुळे पालिकेला कचरा उचलणं भाग पडलं. मात्र सोसायट्यांना किती वेळा मुदत वाढवून द्यायची? आणि तरीसुद्धा सोसायट्या पालिकेनं घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं राजकीय पक्षांनी सोसायट्यांसाठी कचरा प्रक्रिया मार्गदर्शनपर उपक्रम सुद्धा राबवण्याची गरज यानंतर व्यक्त होतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 26 जानेवारीपासून पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं? याकडे अंबरनाथकरांचं लक्ष लागलं आहे. (Shiv Sena-BJP angry over Ambernath garbage, A warning to both parties to agitate)
इतर बातम्या
Kalyan : नगरसेवकांवरील गुन्ह्याप्रकरणी भाजप शिवसेनेचे परस्परांविरोधात आरोप प्रत्यारोप