भाजप-शिंदे गटातील वादानंतर श्रीकांत शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया; भरसभेतून भाजप आणि…
शिंदे साहेबांनी तुम्हाला जीव लावला. कोणतीही आपत्ती आली तर एकनाथ शिंदेच मागे उभे राहायचे. मग ते तुम्हाला खुपायला का लागले?, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला.
कल्याण : भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून या दोन्ही पक्षात वाद सुरू झाले आहेत. भाजपकडून कुरघोडी होत असल्याने शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देण्याची धमकी दिली. त्यानंतर कल्याण, डोंबिवली आणि उल्हानगरात दोन्ही गटाकडून पोस्टरवार सुरू झालं. त्यातच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपकडून पहिल्यांदाच ही टीका करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटही चवताळला आणि त्यांनीही बोंडे यांची औकात काढली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कल्याणमध्ये शिंदे गटाचा मेळावा होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. आपली युती नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या भावना आवरा. युती धर्म पाळा. एकत्र येऊन काम कराल तर काम चागल होतंय, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी दोन्हीकडच्या नेत्यांना सुनावले. तसेच उत्साहाच्या भरात काही कार्यकर्त्यांनी पोस्टर लावल्याचंही त्यांनी सांगितलं.
आमचं चुकलं कुठं?
या मेळाव्यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. अगोदरच सरकार घरी होतं. आता हे सरकार आपल्या दारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप वेळ होता. त्यामुळे ते पंढरपूरला गाडी चालवत जायचे, अशी टीकाही त्यंनी केली. तसेच राम मंदिर बांधणाऱ्यांसोबत गेलो तर बिघडलं कुठे?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. काँग्रेससोबत जाण्याआधी मी माझं दुकान बंद करेल, असं बाळासाहेबांनीच सांगितलं होतं ना? मात्र, हे सत्तेसाठी पायऊतार झाले, अशी टीकाही त्यांनी केली.
ते मान्य आहे काय?
कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून सावरकरांचे धडे वगळले आहेत. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आता जे लोक काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी सांगावं त्यांना हे मान्य आहे काय? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
तरीही टॉप फाईव्हमध्ये कसे?
त्यांच्या डोक्यात खोके प्रचंड घुसले आहेत. आधी खोके यायचे आता ते बंद झाले आहेत, अशी टीका करतानाच कोरोना काळात सामान्य शिवसैनिक रस्त्यावर राबला. घराबाहेर पडला. यांनी फक्त ऑनलाईन मार्गदर्शन केलं. तरीही ते टॉप 5मध्ये कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.