सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 17 नोव्हेंबर 2023 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (16 नोव्हेंबर) मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर आमदार, मंत्री आणि पदाधिकारी देखील गेले होते. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन निघून गेले. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील बाळासाहेबांना वंदन करुन जात होते. पण त्याचवेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे आले. दोन्ही गटामध्ये मोठा वाद उफाळला. दोन्ही बाजूने धक्काबुक्की आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. प्रचंड मोठा राडा बघायला मिळाला. या राड्यावेळी पोलिसांना देखील दोन्ही गटांना आवडणं कठीण होऊन बसलं होतं. दोन ते तीन तास हा राडा चालला. पोलिसांनी अखेर सर्वांना शिवाजी पार्क मैदानातून बाहेर काढले होते. मुंबईत दोन्ही गटात इतका मोठा राडा झाला. पण आज कल्याणमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालेलं बघायला मिळालं.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर त्यांच्यात राडादेखील झाला. मात्र कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गट ठाकरे गटाच मनोमिलनच असल्याचे दिसून आलं. कल्याणच्या भगवा तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर शिंदे आणि ठाकरे गटाकडून अभिवादन करण्यात आलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त आज कल्याणच्या भगवा तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी गेले, त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले.
यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी समोरासमोर आले. इतक्यात आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही आम्हाला बघून आलेत का? असा प्रश्न केला. इतक्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी रवींद्र कपोते यांनी त्याच्याशी बोलत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना जरांगे यांच्या सभेत मजबूत बोल, असा सल्ला दिला. यावेळी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हास्य उमटले.
एकीकडे काल दादरमध्ये झालेल्या राड्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट एकामेकांविरोधात आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कल्याण पश्चिममध्ये दोन्ही गट एकामेकांची थट्टा, मस्करी करत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना हात मिळवून बोलताना दिसले. त्यातून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात मनोमिलनच झाले असल्याचे चित्र दिसून आले.