‘धर्मवीर- 2’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘धर्मवीर- 2’ या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा काल पार पडला. यावर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. पक्ष चोरणं हे आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व नाही!, असं म्हणत केदार दिघे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
धर्मवीर 2 या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आलं. यामध्ये ‘हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’ असं वाक्य वापरण्यात आलं आहे. यावर आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी घेतला आहे. शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या या घोषवाक्याचा चांगला समाचार त्यांनी घेतला आहे. याबाबत सोशल मीडिया एक्सवर ट्विट करताना केदार दिघे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘धर्मवीर- 2’ या चित्रपटात ठाकरेंच्या शिवसेनेची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न मिंधे गटाकडून होऊ शकतो. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दिघे साहेबांची प्रतिमा एकनाथ शिंदे वापरत आहेत, असा घणाघात केदार दिघे यांनी केला आहे.
पक्ष चोरणं हे साहेबांचं हिंदुत्व नाही. साहेबांचं हिंदुत्व काय होतं हे आम्ही सांगणार आहोत. त्याची स्पेशल शिकवणी मिंधे गटाला आम्ही लावणार आहोत. एक चित्रपट काढला गद्दारी करायला आता दुसरा चित्रपट काढत आहेत स्वतःची गद्दारी पचवायला! जितक्या लवकर होईल तितक्या लवकर यांच्यापासून सावध व्हा!
पक्ष चोरण हे साहेबांचं हिंदुत्व नाही.साहेबांचं हिंदुत्व काय होतं हे आम्ही सांगणार आहोत.त्याची स्पेशल शिकवणी मिंधे गटाला आम्ही लावणार आहोत.एक चित्रपट काढला गद्दारी करायला आता दुसरा चित्रपट काढत आहेत स्वतःची गद्दारी पचवायला! जितक्या लवकर होईल तितक्या लवकर यांच्यापासून सावध व्हा!
— Kedar Dighe (@MiKedarDighe) July 1, 2024
‘धर्मवीर- 2’ हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते बॉबी देओल, अभिनेते- दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थित पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला.