घर चालवण्यासाठी नोकरी, लग्नानंतर मुलगी झाली, त्यानंतरही रॅम्पवर चालून केलं स्वप्न पूर्ण
डायडेम मिसेस महाराष्ट्र ही स्पर्धा ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. त्यानंतर त्यांची निवड थेट डायडेम मिसेस इंडिया लेगसीमध्ये झाली. या स्पर्धेतही संपूर्ण भारतातून 26 महिला सहभागी झाल्या होत्या.
सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : आर्थिक अडचण असो किंवा मग संसारातील जबाबदारी असो. महिलांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. अशीच तारेवरची कसरत करणारी ठाण्यातील श्रद्धा मोरे हिने नुकताच दिल्लीत पार पडलेल्या डायडेम मिसेस इंडिया लेगसी या स्पर्धेसाठी ब्युटी विथ पर्पज या शीर्षकाखाली तिची निवड झाली. रॅम्पच्या झगमगाटात, दिलखेचक अदा आणि भारावून टाकणाऱ्या संगीताच्या वलयांकित मॉडेलिंग क्षेत्रात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने आपला ठसा उमटवला आहे.
भविष्यात एखाद्याने आव्हाने स्वीकारणे आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा ठाम विश्वास असणाऱ्या 33 वर्षीय श्रद्धाने आईचे कर्तव्य पार पाडले. शिवाय दिल्लीत झालेल्या डायडेम या स्पर्धेत आपली चमक दाखवली. यावेळी श्रद्धाने ब्युटी विथ पर्पजचा किताब पटकावला आहे.
अशा झाल्या स्पर्धेत सहभागी
सुरुवातीला डायडेम मिसेस महाराष्ट्र ही स्पर्धा ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. त्यानंतर त्यांची निवड थेट डायडेम मिसेस इंडिया लेगसीमध्ये झाली. या स्पर्धेतही संपूर्ण भारतातून 26 महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र ठाण्यातील श्रद्धा ब्युटी विथ पर्पज या शिर्षकाखाली त्या यशस्वी झाल्या. त्यांनी महाविद्यालयीन दिवसात त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली.
विशेष म्हणजे मिळालेल्या बक्षीस रकमेमुळे त्यांना शिक्षण शुल्क भरण्यास मदत होत असे. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे नोकरी करणे अनिवार्य होते. नोकरी लागल्यानंतर त्यांची रॅम्पवर चालायची आवड त्यांनी बाजूला ठेवली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि मुलगीही झाली. मात्र आपले स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा झगमगत्या दुनियेच्या रंगमंचाकडे जाण्याचे ठरवले.
मासिक सत्य हा टास्क केला पूर्ण
या स्पर्धेमध्ये विविध टास्क देण्यात आले होते. यामध्ये श्रद्धा यांनी विक्रम गडसारख्या ग्रामीण भागात मासिक पाळी या विषयावर काम केले. पर्यावरणीय दृष्ट्या बायो डिग्रेडेबल प्रोडक्ट्स वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी महिलांना पटवून दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा वापरलेले मटेरियल कुठे फेकायचे हा प्रश्न सुटला. याचबरोबर शहरातही त्यांनी अशा पद्धतीचे अनेक कॅम्प राबविण्याचे त्यांनी सांगितले. कॉलेजेस, कॉर्पोरेटस् आणि सोसायटीमध्ये मासिक सत्य या विषयावर जगृतीसाठी सेमिनार आयोजित केले.