गुरुपौर्णिमा विशेष! लालपरी घडवणार गुरुदेवदर्शन, एसटीच्या शिर्डी, अक्कलकोट, खोपोलीसाठी विशेष गाड्या
ST Bus Booking : महामंडळाच्या ठाणे विभागाकडून गुरुपौर्णिमेनिमित्त खास बस चालवल्या जाणार आहेत
ठाणे : गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupournima Special) विशेष गाड्या एसटी महामंडळाकडून चालवल्या जाणार आहेत. आषाढीनंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेसाठी एसटी महामंडळाचा (MSRTC Bus) ठाणे विभाग सज्ज झालाय. त्यामुळे आता कोरोनाच्या संकटानंतर भाविकांमध्ये भक्तीचा गजर घुमणार आहे. शिर्डी (Shirdi), अक्कलकोट, गणेशपुरी, खोपोली अशा धार्मिकस्थळी विशेष बस सेवा चालवली जाणार आहे. याचा फायदा अनेक भाविकांना होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. महामंडळाच्या ठाणे विभागाकडून गुरुपौर्णिमेनिमित्त खास बस चालवल्या जाणार आहेत. कोरोना महामारीदरम्यान, दोन वर्ष धार्मिक स्थळं बंद होती. त्यामुळे हिरमोड झालेल्या भाविकांना या वर्षी पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचं दर्शन घडविण्याचा सुवर्ण योग साधला जाणार आहे. एसटी महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या या सेवेला प्रवाशांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहमं महत्त्वाचंय.
जादा गाड्यांचं नियोजन
कोरोना महामारीनंतर सगळ्या गोष्टी पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता भाविक पुन्हा एकदा दोन वर्षांनी आपल्या इच्छित धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी बाहेर पडतील, अशी शक्यता आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठीही आधीच जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, एकादशीसाठीही विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता ठाणे कल्याण येथून शिर्डी अक्कलकोट, खोपोली, गणेशपुरी याठिकाणी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सात जादा गाड्या ठाणे विभागाच्या एसटी महामंडळाकडून सोडण्यात आल्या आहेत. यासाठी प्रवाशांना परतीच्या प्रवासाचीही व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
किती असेल तिकीट?
- ठाणे ते अक्कलकोटचे – 55 रुपये असणार असून या गाड्या आजपासून (12 जुलै) सायंकाळी लोकमान्यनगर आणि खोपट येथून रात्री सुटणार.
- कल्याण ते अक्कलकोट – 670 रुपये,
- ठाणे ते शिर्डी बसचे भाडे 375 रुपये
- कल्याण ते अक्कलकोट, ठाणे ते शिर्डी बस लोकमान्यनगर आणि खोपट येथूनच सुटणार
- गणेशपुरीचे 80 आणि खोपोलीचे गगनगिरी महाराज मठाचे भाडे 105 रुपये
- गणेशपुरी आणि खोपोलीसाठीच्या जादा बसेस खोपट येथून सोडण्यात येणार
सर्व गाड्यांच्या तिकीट आरक्षणाला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाकडून देण्यात आली आहे. आता प्रवासी नेमके या सेवेला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.