‘देवेंद्र फडणवीस सत्ता प्रेमाने तुम्ही धृतराष्ट्र झालात’, सुषमा अंधारे यांची खोचक टीका
सुषमा अंधारे यांनी आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड आक्रमकपणे निशाणा साधला.
ठाणे : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पोहोचलीय. या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अंधारे यांनी फडणवीसांवर टीका करताना त्यांना महाभारतातील धृतराष्ट्राची उपमा दिली. “देवेंद्रभाऊ तुम्ही गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहात. सत्ता प्रेमाने तुम्ही धृतराष्ट्र झालेले आहात”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.
“या ज्या लोकांना तुम्ही बोलायला भाग पाडतात ते सगळे शिंदे गटाचे असतात. कारण नुकसान झालं तर त्यांचं होईल आणि आपण सेफ राहू”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना उद्देशून केली.
“भाजपला सगळे पक्ष संपवायचे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट, प्रहार पक्ष हे सगळं त्यांना संपवायचं आहे. लोक आमदार रवी राणांची माफी लक्षात ठेवणार नाहीत. लोक आमदार बच्चू कडूंवर झालेले आरोप लक्षात ठेवतील. त्यांना विरोधी पक्षच संपवायचे असतील तर स्वातंत्र्य लढ्याला काय अर्थ आहे?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
“माझ्याकडे काहीच नाहीये त्यामुळे मला ईडीची भीती नाहीय. एक लेकरू आहे ते शिवसेनेला दान केलंय. मुख्यमंत्री जर तीन महिन्यात माझ्या मागे हात धुवून लागले असतील, तर लक्षात ठेवा. बाजी पलटने वाली है”, असा इशारा अंधारे यांनी दिला.
“खबऱ्यांनो… मी एकटी फिरते. मला वाय प्लस सुरक्षा लागत नाही. ज्यांना लोकांची भीती वाटते ते सुरक्षा घेऊन फिरतात. आमच्या नेत्यांची सुरक्षा काढणं हे कुटील डाव कळतात देवेंद्रभाऊ.. आम्ही लढणार आहोत. लढताना आमच्या सुसंस्कृत, संयमी नेतृत्त्वाला शोभेल असं लढू. विश्वास बाळगू की वो आझादी की सुबह आने वाली है..”, असं सुषमा अंधारे म्हणाले.
“भाजप आमदार राम कदम म्हणाले की गुजरात पाकिस्तानात आहे का? हे राम कदम तेच आहेत जे म्हणाले होते कोणती पोरगी आवडते सांगा, उचलून आणतो. तेव्हा राम कदमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नाही. त्यांना प्रवक्ता करताना भाजपला लाज कशी वाटली नाही?”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.