ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर
ठाणे : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्गही बंद राहणार आहेत, तर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरूच राहणार आहेत.
ठाणे : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्गही बंद राहणार आहेत, तर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरूच राहणार आहेत. ओमिक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.
कोणते वर्ग सुरू कोणते बंद?
सद्यस्थितीत सर्वत्र ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा वाढता प्रभाव व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व 11 वीच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दिनांक 4 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत. तर 10 वी व 12 वीचे नियमित वर्ग सुरूच राहणार आहे.
यामध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व 11 वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू राहणार आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्षे वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण सुरू राहणार आहे. याकरिता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलविण्यात येणार आहे. तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने 15 ते 18 वयोगटासाठी सुरू करण्यात लसीकरण मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जावून लस घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
शिक्षणमंत्र्यांकडून शाळा आणि लसीकरणाचा आढावा
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत कोरोना स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.