‘बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शाखा…’, राजन विचारे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या ठाण्यातील पक्षाच्या शाखा बळकावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केलाय.
ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या ठाण्यातील पक्षाच्या शाखा बळकावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केलाय. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन राजन विचारे यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलंय. त्यांनी निवेदन दिल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिंदे गटाकडून शाखा बळकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.
“ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं की गेल्या 6 महिन्यांपासून शिवसैनिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेल्या शिवसेनेच्या शाखा बळकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे”, अशी प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिली.
“आजच संजय राऊत यांनाही धमकी आली आहे. त्यांनी पोलिसांना पत्र दिलं आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार यांचं संरक्षण काढलं आहे. चार महिन्यांपूर्वी मी वागळे इस्टेटमध्ये गेलो असता जो प्रकार झाला तो महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे याची दखल शिवसैनिकांनीही घेतली असून ते असंच जर वागणार असतील तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ”, असा इशारा त्यांनी दिला.
राजन विचारे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
ठाणे शहरातील शिवसेना पक्षाच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या मिंधे गटाला योग्य समज द्या, अशा शब्दांत राजन विचारे यांनी पोलिसांना विनंती केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा बळकावणाऱ्या मिंढे गटाला योग्य समज द्यावी तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याची दक्षता घ्यावी अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्राद्वारे करण्यात आली असल्याची माहिती राजन विचारे यांनी दिली.
खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, सचिव संजीव कुलकर्णी, ठाणे युवा सेना अधिकारी किरण जाधव, सहप्रवक्ता तुषार रसाळ, चंद्रभान आझाद, महिला आघाडी रेखा खोपकर, समिधा मोहिते, महेश्वरी तरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, उप शहर संघटक भारती गायकवाड हे नेते पोलीस आयुक्तांना पत्र देण्याच्यावेळी उपस्थित होते.
त्या पत्रामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून 56 वर्षामध्ये महाराष्ट्रात अनेक शिवसेना शाखा आणि कार्यालये सुरु आहेत. त्यापैकी ठाण्यामध्येही गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये शिवसेनेच्या कार्यालये (शाखा) कार्यान्वयित आहेत. त्यापैकी काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे.
असे असताना सुद्धा मिंधे गटाकडून सातत्याने जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून पक्ष कार्यालये (शाखा) बळकावण्यात आलेल्या आहेत. पक्षाशी द्रोह करण्याऱ्या गटाच्या पात्र अपात्रतेचा व नुकताच निवडणूक आयोगाने चुकीच्या घेतलेल्या निर्णयाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षडयंत्र गुंडांमार्फत रचले जात आहेत.
समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मिंधे गटाला पोलीस यंत्रणेने प्रोत्साहन न देता योग्य समज द्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी मिंधे गटाची व पोलीस खात्याची राहील असे पत्रामध्ये म्हटलं आहे.