Thane: पेट्रोलनंतर आता सीएनजीसुद्धा महागले, किमान भाडे 25 रुपये करण्याची ऑटो चालकांची मागणी
पेट्रोलनंतर आता सीएनजीचेही दर वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना जुन्या दरपत्रकाप्रमाणे रिक्षा चालवणे कठीण होऊ लागले आहे. म्हणूनच जवळपास ठाण्यातील सर्वच रिक्षा चालक करत आहेत
ठाणे, पेट्रोल- डिझेलप्रमाणेचे सीएनजीचे (CNG rate in mumbai) भाव वाढल्यामुळे किमान भाडे 21 रुपये परवडत नसल्याचा सूर ठाण्यातील रिक्षा संघटनांनी लावला आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर ठाणेकरांनाही आता रिक्षा दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. एक तर सीएनजीचे दर कमी करा अन्यथा रिक्षा भाडेवाढ मंजूर करा, असे निवेदन त्यांनी राज्य सरकारला पाठवले आहे. पेट्रोलनंतर आता सीएनजीचेही दर वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना जुन्या दरपत्रकाप्रमाणे रिक्षा चालवणे कठीण होऊ लागले आहे. म्हणूनच जवळपास ठाण्यातील सर्वच रिक्षा चालक करत आहेत, परंतु सध्या परिवहन खात्याला जबाबदार मंत्री नसल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे, महत्त्वाचे निर्णय ठप्प झाले असल्याचे ठाणे येथील रिक्षाचालकांनी सांगितले. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन ठाणे विभाग टॅक्सी-रिक्षा महासंघ स्थापन केला आहे.
याच महासंघाच्या अधिपत्याखाली त्यांनी ठाणे विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे, तर कै. वसंत डावखरे रिक्षा टॅक्सी चालक अध्यक्ष राजू सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 6 न रिक्षेच्या भाडेवाढीसह अन्य मागण्यांचे निवेदन सादर केले असल्याचे सांगितले.
प्रस्ताव सरकारदरबारी
ठाण्यात अंदाजे एकूण 25 हजार रिक्षा आहेत, त्यातील 15 हजार शेअर रिक्षा आहेत. सध्या पेट्रोल 106 रुपये लिटर झाले असून, सर्वांत स्वस्त वाटणारा सीएनजी आता 60 रुपयांवरून 80 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे सध्याचे 21 रुपये हा दर रिक्षाचालकांना परवडेनासे झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध रिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये त्यांनी सीएनजी दर पूर्वीप्रमाणे 60 रुपये करावा अन्यथा 25 रुपये दर करावा, अशी मागणी सरकारकडे देण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर शेअर रिक्षाचेही भाडे एक रुपयाने वाढणार असल्याची माहिती ठाणे रिक्षा संघटना अध्यक्ष राजू सावंत यांनी दिली.