भाजपच्या ‘मी पुन्हा येईन’ ट्विटने खळबळ; चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण, ‘तो’ दावा कायम
Chandrashekhar Bawankule on Devendra Fadnavis and Maharashtra BJP Tweet : भाजपच्या 'त्या' ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण; 'तो' दावा कायम... चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीवर काय म्हटलंय? त्यांचा दावा काय आहे? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? वाचा...
ठाणे | 28 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्र भाजपकडून काल एक ट्विट करण्यात आलं. 2019 च्या निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येण्याचा नारा दिला. ठिकठिकाणच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईल’ असा नारा दिला. त्यांचा तो व्हीजिओ काल महाराष्ट्र भाजपकडून ट्विट करण्यात आला. पण हे ट्विट पुढच्या तासाभरात डिलीट झालं. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत का? अशी चर्चा रंगली. या ट्विटवर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रेतील तो व्हीडिओ आहे. कुणीतरी उत्साही कार्यकर्त्यांने ट्विट केला. जर आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी बसवायचं असतं. तर आम्ही आता तो व्हीडिओ तयार केला असता. जुना व्हीडिओ कशाला शेअर केला असता? देवेंद्र फडणवीस यांनी स्वत : आणि मी अनेकदा याबाबत सांगितलं आहे. आता एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील. पुढच्या निवडणुका एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातच लढल्या जातील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज भिवंडी कल्याण या भागात दौरा करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे. कल्याण भिवंडी लोकसभेत बावनकुळे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. भाजप कार्यकर्त्याकडून आज आणि उद्या कल्याण आणि भिवंडी लोकसभेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. याच दौऱ्या दरम्यान बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
भिवंडीमध्य आज मी फिरलो. लोकांचं मोदी सरकारबद्दल चांगलं मत आहे. अनेक लोकांना आज मी भेटलो. त्यांनी मला हेच सांगितलं की पुढच्यावेळीही आम्हाला मोदीच पंतप्रधान हवे आहेत. एकही माणूस मोदीजींच्या विरोधात बोलला नाही. त्यांनी नरेंद्र मोदी यांचं समर्थनच केलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.