Thane: ठाणे जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा
जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया - जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांचे आवाहन
ठाणे : ग्रामीण भागात विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वी अमंलबजावणी करून जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या वतीने ‘शिवस्वराज्य’ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती पाटील यांच्या शुभहस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले.
आपल्या कार्यालयात अनेक लोकं विविध कामांसाठी येत असतात, त्यांना दिलासा कसा देता येईल याकडे प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी लक्ष दिले पाहिजे, असे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद सदस्या रेखा कंठे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या भारतवर्षाचे प्रेरणास्त्रोत आहेत. रयतेचे राज्य् व्हावे, रयत सुखी व्हावी या साठी महाराजांनी किल्ले रायगडावर आजच्या दिवशी राज्याभिषेक करुन घेतला. त्यामुळे आपण हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करीत आहोत.
शिवमय वातावरण
दरम्यान व्यासपीठाच्या मागील बाजूस महाराजांची सिंहासनारूढ साकारण्यात आलेली भव्य प्रतिमा, व्यासपीठाची आकर्षक सजावट, पारंपरिक वेश परिधान करून तुतारीच्या स्वरांनी मान्यवरांचे होणारे स्वागत, पहाडी आवाजात शाहिरांनी सादर केलेले पोवाडे, प्रवेशाला मनमोहक रेखाटलेली रांगोळी, भगवा फेटा घालून अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती, असे भारावलेले शिवमय वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समोर तोडणकर, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.जोकर, कृषी अधिकारी सारिका शेलार आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे रवींद्र तरे आणि समूहाने राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि पोवाडे सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. श्री. गुंजाळ यांनी आभार व्यक्त केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
ग्रामपंचायत , पंचायत समितीने साजरा केला शिवस्वराज्य दिन
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शिवस्वराज दिन मोठया उत्साहात साजरा होत असताना, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आदी तालुक्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरही शिवस्वराज्य दिन।उत्साहात साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.