Dombivali Crime: चाकूच्या धाकाने बँक मॅनेजरला लूटले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
काही क्षणांतच या चोरट्यांनी संतोषकुमार यांना घेरले व त्यांच्या गळ्यावर चाकू लावून त्यांना लुटले. त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल, क्रेडिट कार्ड. येस बँकेचे एटीएम आदी मौल्यवान ऐवज घेऊन ते सर्व लुटारू घटनास्थळावरून पसार झाले.
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली परिसरात बॅंक कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडलेल्या लुटीच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. चाकूचा धाक दाखवित एका बँक मॅनेजरला लुटण्याची धक्कादायक घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या फूटेजच्या आधारे रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरु केला आहे.
चोरट्यांनी मास्क लावून स्वतःची ओळख लपवली
मुंबईतील एका खाजगी बँकेत मॅनेजर पदावर असलेले संतोषकुमार शर्मा यांना लुटारूने लुटल्याचे उघडकीस आले आहे. संतोषकुमार हे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. 24 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांच्या आसपास संतोषकुमार रस्त्याने घरी जात होते. यावेळी मास्क परिधान केलेल्या चार ते पाच लुटारूंनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
काही क्षणांतच या चोरट्यांनी संतोषकुमार यांना घेरले व त्यांच्या गळ्यावर चाकू लावून त्यांना लुटले. त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल, क्रेडिट कार्ड. येस बँकेचे एटीएम आदी मौल्यवान ऐवज घेऊन ते सर्व लुटारू घटनास्थळावरून पसार झाले. संतोषकुमार शर्मा यांनी या लुटीची पोलिसांना तातडीने खबर दिली. तसेच रामनगर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
सीसीटीव्हीमध्ये पाच लुटारू दिसले
लूटीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेतला. त्यातील फूटेजमध्ये बॅंक मॅनेजर संतोषकुमार यांचा पाच लुटारूंनी पाठलाग केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व आरोपी पळतानाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये पाच आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. त्यातील एका चोरट्याकडे लुटलेली बॅग आहे. या सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिस पुढील तपास करीत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ठाकुर्ली परिसरात 90 फीट रस्ता हा असुरक्षित मानला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांचा वावर असतो. तसेच दिवसा मोठ्या प्रमाणावर प्रेमीयुगल या रस्त्यावर असतात. त्यामुळे या परिसरात लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कल्याण डोंबिवलीत चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र लूटीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. (The bank manager was robbed with a knife; Shocking type in Dombivli)
इतर बातम्या
Jammu-Kashmir : काश्मिर खोऱ्यात सुरक्षा दलांची धडाकेबाज कारवाई; 36 तासांत तिसरे एन्काऊंटर
kalyan Crime: सराईत गुन्हेगाराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केली अटक