उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील शेकडो अनधिकृत इमारती (Illegal Buildings) अधिकृत होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी विधिमंडळात याबाबतची घोषणा केल्यानंतर आज उल्हासनगरवासीयांनी आनंद साजरा केला. उल्हासनगर शहरात जवळपास सर्वच इमारती या अनधिकृत असून बहुतांशी इमारती आता जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळं इमारतींचे स्लॅब कोसळणे, इमारत कोसळणे अशा अनेक घटना आजवर घडल्या असून, त्यात अनेक निष्पापांचे आजवर बळी गेले आहेत. गुरुवारीही उल्हासनगरात एका इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. मात्र या इमारती अनधिकृत असल्यानं त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नव्हता. या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील 31 डिसेंबर 2021 पर्यंत उभारलेल्या सर्व इमारती नियमित (Regular) करण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.
अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदनिकाधारकाला 220 रुपये प्रति स्क्वेअर फूट दंड भरावा लागणार असून त्यानंतर इमारत नियमित होऊन सोसायटीला जागेचं प्रॉपर्टी कार्डही मिळणार आहे. या निर्णयामुळे मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर आज उल्हासनगरात शिंदे गटाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानण्यात आले. तसंच एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.
उल्हासनगरातील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे अरुण आशान, राजेंद्रसिंह भुल्लर, नाना बागुल, कलवंत सिंग सोहता, सुरेश जाधव, जयकुमार केणी, अंकुश म्हस्के, मनिषा भानुशाली, समिधा कोरडे आदी स्थानिक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. यावेळी या निर्णयासाठी पाठपुरावा केलेले कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उल्हासनगरच्या दिवंगत माजी आमदार ज्योती पप्पू कलानी, विद्यमान आमदार कुमार आयलानी, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचेही शहरवासीयांनी आभार मानले. या निर्णयामुळे उल्हासनगरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Unauthorized buildings of Ulhasnagar will be regularized, Chief Minister Eknath Shinde announced in the legislature)