ठाणे, ३ सप्टेंबर २०२३ : पावभाजी हा मुंबईकरांचा आवडता पदार्थ. पण, पावभाजीमध्ये किती हायजीन कोण पाळतो, यावर सर्व अवलंबून आहे. पावभाजी तयार करताना किती काळजी घेतली जाते. मुंबईकरांच्या आरोग्याशी कुणी खेळत तर नाही, असा प्रश्न कधीकधी निर्माण होतो. पावभाजी हा सर्वांचाच आवडता खाद्यपदार्थ. जेवणाऐवजी अनेक खवय्ये याच पावभाजीला आपली पसंती देतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ठाण्यातील पावभाजी सेंटरवरील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या “कॅनन पावभाजी आणि स्नॅक्स” या सुप्रसिद्ध पावभाजी सेंटरमध्ये चक्क उंदरांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे.
या पावभाजी सेंटरमध्ये मोठमोठाले उंदीर मुक्त संचार करत आहेत. ही दृश्य बघताना अंगावर शिसारी येते. उंदरांमुळे लेप्टोस्पायरॉसिससारखे अनेक जीवघेणे आजार पसरतात. त्यामुळे त्यांच्या हॉटेलमधील या मुक्तसंचारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
सदर पावभाजी सेंटरचा मालक हा ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉन असल्याची चर्चा आहे. अनधिकृत धंदेवाल्यांकडून हफ्ते देखील गोळा करतो, असा दबक्या आवाजात आरोप काही स्थानिकांनी केला आहे.
ठाणे स्टेशनला उतरलात आणि पावभाजी खावीशी वाटलीच तर पुन्हा एकदा विचार करा. कारण तुमच्याआधी या पावभाजीचा आस्वाद उंदीर घेतायत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये “कॅनन पावभाजी अँड स्नॅक्स” दुकानात उंदरांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व खवय्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यावर कारवाईची मागणी होत आहे. माणसांनी खाण्याची पावभाजी आधी उंदीर खात असतील तर नक्कीच मानवी प्रकृतीस धोका आहे. अशा दुकानदारांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग काय कारवाई करतो, हे पाहावं लागेल.