ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना विचारलं असता, राऊत साहेबांच्या मताशी मी सहमत असल्याचं मिटकरी म्हणाले. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत मिटकरी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ज्या अंजली दमानिया यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या याबाबत ट्विट करतात आणि त्याच्या बातम्या बनतात. अजित दादा हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे.
आता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये अजिबात तथ्य नाही. हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. तर राज्यातलं सध्याचं सरकार हे जास्त दिवस टिकणार नसल्याचाही दावा त्यांनी केला.
आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही आणि राज्यात लवकरच एक नवीन महाविकास आघाडीचं सरकार येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले.
राज्यात शेतकरी अडचणीत आहे. अकोला जिल्ह्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. मात्र कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही पंचनामे करण्यात आले नाहीत. शेतकऱ्यांना कोणतीही भरपाईसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार जर राम राज्याची वल्गना करत असेल, तर या राम राज्यात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसंच या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त स्वतःची पब्लिसिटी आणि हवाई दौरे करायचे. यातच सरकार गुंतलेलं आहे. म्हणून हे सरकार जास्त दिवस राहील असं मला वाटत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.