ठाण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले, अद्यापही आरोपी मोकाट
अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात 1 मे रोजी बैलगाडा शर्यती पार पडल्या होत्या. या शर्यतीदरम्यान एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल होऊन देखील अद्यापही या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. घटनेला पाच दिवस उलटून गेले आहेत.
ठाणे : अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील उसाटणे गावात 1 मे रोजी बैलगाडा शर्यती (bullock cart race) पार पडल्या होत्या. या शर्यतींमध्ये दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण (beaten) करण्यात आली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन 5 दिवस उलटले आहेत, मात्र तरीही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळं पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात 1 मे रोजी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीदरम्यान दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या शर्यतींमध्ये कर्जत इथं राहणारा बैलगाडा मालक कल्पेश म्हसे आणि नितळस गावात राहणारा कुणाल काटे हे दोघेही त्यांचे बैलं घेऊन आले होते. यापूर्वी काकडवाल गावात झालेल्या शर्यतींमध्ये कल्पेश याच्या बैलांनी कुणालच्या बैलांना हरवलं होतं. त्यामुळं त्या पराभवाचा राग काढण्यासाठी कुणाल यानं उसाटणे गावातल्या शर्यतींदरम्यान कल्पेश म्हसे याच्यावर हल्ला केला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या डोक्याला रॉडने मारहाण केली. या मारहाणीत कल्पेशचं डोकं फुटलं आणि त्याच्या गळ्यातली 2 तोळ्यांची सोन्याची चेन गहाळ झाली.
आरोपींना अटक करण्याची मागणी
यानंतर जखमी अवस्थेतील कल्पेश याने उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 324, 323, 427 अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटल्यानंतर देखील अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळं पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करावी, आरोपींना अटक करावी अशी मागणी फिर्यादी कल्पेश म्हसे याने केली आहे. तसेच या शर्यतीमध्ये नियमांचे उल्लंघ झाल्याचे देखील समोर आले आहे.
शर्यतीत नियमांचे उल्लंघन
उसाटणे गावात झालेल्या याच शर्यतींमध्ये अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचंही समोर आलंय. शर्यतीला किती वाजेपर्यंत परवानगी होती आणि प्रत्यक्षात शर्यती किती वाजेपर्यंत सुरू होत्या? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान एवढेच नाही तर याच शर्यतीवर सट्टा देखील लावण्यात आला होता, अशी चर्चा आहे. याबाबत हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांना विचारलं असता, या प्रकरणातील तपास पोलीस हवालदारांची मलंगगडावर ड्युटी लागल्याने तपास होऊ शकलेला नसल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.