कल्याणच्या मलंगगड रोडवरचा भलामोठा चर्चेतला खड्डा, तरुणाचा अपघात, गंभीर जखमी
खड्ड्यांमुळे एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.
कल्याण (पुणे) : खड्ड्यांमुळे एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण मलंग रोडवरील असलेल्या दीड फूट खोल खड्ड्यात सागर ब्रह्मा राठोड हा तरुण दुचाकीवरुन जात असताना पडला. या दुर्घटनेत त्याच्या चेहऱ्यावरील नाक, डोळा, ओठाला गंभीर दुखापत झाल्याने टाके मारावे लागले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. 19 जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सागर राठोड हा विद्यार्थी दुचाकीवरुन घरी जात होता. त्याची बाईक काकाचा ढाब्यासमोर असलेल्या दीड फूट खोल खड्ड्यात आदळली. त्यामुळे सागर रस्त्यावर पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोळ्याला, नाकाला आणि ओठाला गंभीर दुखापत झाली.
सागरला कुणाल पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सागरचे वडील रिक्षा चालवितात. त्याला आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. सागर हा विद्यार्थी आहे. तो कोळेगाव येथे राहतो. रुग्णालयात उपचाराचा खर्च कसा देणार? असा सवाल त्याच्यासमोर होता. मात्र कुणाल पाटील फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्यात आला आहे.
खड्ड्यांवरुन आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलने
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सागरला अपघात झाला त्याच खड्ड्याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने मंगळवारी (20 जुलै) दिलं होतं. खड्डे बुजविण्यावर होणाऱ्या खर्चावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सवाल उपस्थित केला होता. हे खड्डे भरण्यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वतीने खड्डे भरो आंदोलन केले गेले होते. इतकेच नाही तर मनसेने देखील स्वखर्चाने खड्डे भरण्याचे आंदोलन केले होते. तरीदेखील ज्या प्रकारे खड्डे बुजविले गेले पाहिजेत तसे काम केले गेले नाही. तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर आणखीन खड्डे पडले आहे.
संबंधित बातम्या :