‘कुत्रा’ तलावाकडे बघत भुंकत होता, ‘ते’ दृश्य पाहून जमलेल्या लोकांनाही हुंदका आवरला नाही…
रणजीत एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षीचा विद्यार्थी तर कीर्ती यंदा १२ वीच्या वर्गात गेली होती. ती ही हुशार. दहावीच्या परीक्षेत तिला 98 टक्के गुण मिळाले होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांचे नेहमी कौतुक करत.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात रणजित रवींद्रन (२२) आणि कीर्ती रवींद्रन (१६) हे दोघे भाऊ बहीण आपल्या कुटुंबासोबत रहात होते. दोन्ही भावंडे अभ्यासात चांगली होती. रणजीत हा होतकरू मुलगा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षीचा विद्यार्थी तर कीर्ती यंदा १२ वीच्या वर्गात गेली होती. ती ही अभ्यासात हुशार होती. दहावीच्या परीक्षेत तिला 98 टक्के गुण मिळाले होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांचे नेहमी कौतुक करत. या दोन्हीचा होतकरू मुलांची आई शिक्षिका आहे. तर वडीलही उत्तम नोकरीला होते. या चार जणांव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबात आणखी एक सदस्य होता. तो म्हणजे त्यांचा लाडका कुत्रा. त्याचे त्या कुत्र्यावर खूप प्रेम होते.
रणजित आणि कीर्तीचे आईवडील काही कामानिमित्त गावी गेले होते. त्यामुळे घरात हे दोघे भावंड आणि सोबत त्यांचा पाळीव कुत्रा होता. कालचा रविवारचा दिवस तास सुट्टीचा दिवस. हे दोघे भाऊ बहीण आपल्या लाडक्या कुत्र्यासह बाहेर फिरायला निघाले. फिरत फिरत ते दावडी परिसरातील गावदेवी तलावाजवळ आले.
तलाव पाहून त्या बहीण भावाने आपल्या लाडक्या कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी तयारी केली. ते दोघे आपल्या कुत्र्याला घेऊन तलावात उतरले. पाण्यात कुत्र्यासोबत खेळत खेळत आतमध्ये पाण्यात जात होते. आता जात जात ते इतके खोल पाण्यात गेले की त्यांना त्यातून बाहेर पडता येईना.
तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बहीण भाऊ पाण्यात बुडू लागले. त्यांचा तो इमानी कुत्रा मात्र पोहत पाण्याबाहेर आला. त्या दोघांना वाचविण्यासाठी तो तलावाकडे पाहून जोरजोराने भुंकू लागला.
गळ्यात पट्टा असलेल्या त्या कुत्र्याला भुंकताना गावकरी लांबूनच पहात होते. बराच वेळ झाला तरी कुत्रा भुंकतच होता. अखेर काही गावकऱ्यांना संशय आला. त्यातील काहींनी तलावाजवळ धाव घेतली. तलावात काहीच दिसत नव्हते. पण, कुत्रा भुकायचे थांबत नव्हता.
जमलेल्या गावकऱ्यांना काही तरी अनुचित घटना घडली असावी अशी खात्री झाली. त्यांनी लागलीच अग्निशमन विभाग आणि मानपाडा पोलिसांना याबाबत कळविले. मिळालेल्या माहितीच्या आधारे अग्निशमन विभागाच्या जवानांनी तलावात शोध घेतला. त्यावेळी तलावात आत खोल त्या दोन्ही बहीण भावाचे मृतदेह जवानांना सापडले.
अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले. त्या दोघांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मात्र, त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढेपर्यंत तो कुत्रा तसाच भुंकत होता. त्या दोन्ही बहीण भावाचे मृतदेह बाहेर काढल्यानंतरच त्याचा आवाज बंद झाला. मात्र, ते वेदनादायक दृश्य पाहून सारेच गावकरी थक्क झाले. तेथे जमलेल्या काही लोकांना हुंदकाही आवरता आला नाही.