‘पेन्शन’ नाही पण मानधनात केली घसघशीत वाढ, आता ‘या’ घटकालाही दिला सरकारने दिलासा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत या घटकाच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याची घोषणा करत दिलासा दिला आहे.
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचा संप मिटविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि संघटनेचे पदाधिकारी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीनंतर संघटनेने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. एकीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत शासन पूर्णतः सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत या घटकाच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याची घोषणा करत दिलासा दिला आहे.
राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि कला महाविद्यालये यामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती वा अन्य कारणे यामुळे ही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे.
विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यासाठी राज्य शासनाने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती केली आहे. तासिका तत्वावर शिकवणाऱ्या या अध्यापकांनी मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करुन त्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मानधनवाढीच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांचे मानधन वाढविण्यात येत आहे, असे त्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे सांगितले.
उच्च शिक्षण संचालनालय
कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता 625 रुपयांवरून 1 हजार प्रति तास
पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता 750 रुपयांवरून 1 हजार प्रति तास.
शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता 750 रुपयांवरून 1 हजार प्रति तास
तंत्र शिक्षण संचालनालय
उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान 1 हजार रुपयांवरून 1 हजार 500 प्रति तास
पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन 600 रुपयांवरून 1 हजार प्रति तास
पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन 500 रुपयांवरून 800 रु. प्रति तास.
कला संचालनालय
उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर 750 वरुन 1 हजार 500 प्रति तास
कला शिक्षण पदविका तसेच पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन 625 वरुन 1 हजार रुपये प्रति तास