राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर, शासन, प्रशासन आहेच कुठे?
नांदेडच्या घटनेने राज्यात खळबळ माजली. शिंदे सरकारने शासकीय रुग्णालयात उपचाराची मर्यादा पाच लाख इतकी वाढविण्याची तसेच औषध, इंजेक्शन रुग्णांना बाहेरून आणावी लागणार नाहीत अशी घोषणा केली. मात्र, ही घोषणा केवळ कागदावरची नाही ना अशी शंका येऊ लागलीय.
मुंबई : 4 ऑक्टोबर 2023 | नांदेड येथील सरकारी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांमध्ये 35 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. राज्यमंत्री मंडळाच्याबैठकीत त्याचे पडसाद उमटले. या बैठकीतूनच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेडला पाठविण्यात आले. या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक झालाय. परंतु, राज्यातील सर्वच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असल्याचे समोर येत आहे. टीव्ही9 ने घेतलेला आरोग्य यंत्रणेचा हा आढावा पाहाच.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय म्हणजेच मेयो रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आलीय. औषधांचा तुटवडा असल्याने केवळ आयसीयू आणि शस्रक्रिया झालेल्या रुग्णांनाच औषध मिळतेय. दोन वर्षांपासून हापकीनकडून मिळणारे औषध बंद झालेय. तर, स्थानिक पातळीवरील औषध खरेदीची ३० टक्क्यांची मर्यादा संपली. साधे टीटीचे इंजेक्शन, स्पिरीटचाही तुटवडा आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषध खरेदी करावी लागत आहेत.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदार संघातच आरोग्य सेवा वाऱ्यावर
नाशिक : प्रसिद्ध सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या कळवणच्या नांदुरी येथे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च आरोग्य केंद्र उभारण्यात आले. पण, येथे आरोग्य अधिकारी कधीच उपस्थित नसतात. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांच्या नेतृत्वाखाली आरोग्य अधिकाऱ्याच्या खुर्चीला पुष्पहार घालत गांधीगिरी करून निषेध केलाय. वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढलीय. रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. पण, केस पेपर देण्यासाठी आरोग्य अधिकारिक जागेवर नसल्याने संतप्त रुग्णांनी गांधीगिरी केली.
आरोग्यमंत्री यांच्या मतदार संघात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा
धाराशिव : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव मतदारसंघात आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा वाजले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भुम ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय. डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाळाला वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.
गडचिरोली : महिला आणि बालरुग्णालय गडचिरोली येथे दोन महिलांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही महिलांना प्रसूतीसाठीरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीसाठी एका महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय तर दुसऱ्या महिलेला नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र. प्रसूती प्रक्रियेत वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने या दोन महिलांचा मृत्यू झाला होता.
पत्नीसह मुलगी दगावली, पित्याला अश्रू अनावर
नांदेड : शासकीय रुग्णालयात नवजात अर्भकापाठोपाठ मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. लोहा तालुक्यातील मुरंबी गावातील अंजली वाघमारे या शनिवारी प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, दुसऱ्या दिवशी तिचे बाळ दगावले. त्यानंतर काही तासाने अंजलीचाही मृत्यू झाला. पत्नी आणि मुलीला वाचवण्यासाठी कुटुंबाने चाळीस ते पन्नास हजारांचा खर्च केला होता. औषध, रक्त, रक्तपेशी, सर्व तपासण्या बाहेरून केल्या. तरीही डॉक्टर या माय लेकराला वाचवू शकले नाहीत.
रुग्णवाहिकेने अवघ्या दोनच दिवसात मान टाकली
नंदूरबार : जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. दोन दिवसांपूर्वी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. पण, या रुग्णवाहिकेने अवघ्या दोनच दिवसातच मान टाकली. इंजिनमधून ऑइल गळती सुरु आहे. टायरदेखील खराब अवस्थेत आहेत. अशा रुग्णवाहिकेतून नागरिकांचे जीव वाचणार तरी कसे असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दर्जेदार रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होतेय.
धुळे : येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात उपचारासाठी गर्दी होती. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक. मालेगाव येथून नागरिक येथे उपचारासाठी येत असतात. शहरात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी डोके वर काढले आहे. मात्र, येथे कर्मचारी अपुऱ्या प्रमाणात असल्याचा आरोप रुग्णांनी केलाय.