फेअरनेस क्रीममधला पारा चढला, तोंडावर नाही पण किडनीवर परिणाम झाला
अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक कंपनीने बनविलेले फेअसरनेस क्रिमची ट्रीटमेंट एका ब्युटीशिअनने २० वर्षीय तरुणीवर केली. त्यामुळे तिचा चेहरा उजळला. ते पाहून तिची आई आणि बहीण यांनीही ती फेअसरनेस क्रिम वापरायला सुरवात केली.
मुंबई : आपला चेहरा गोरागोमटा आणि आकर्षक दिसावा तसेच चमकदार त्वचेसाठी महिला निरनिराळ्या फेअरनेस क्रीम वापरतात. पण, हीच फेअरनेस क्रीम तुमच्या जीवासाठी घातक ठरू शकते. फेअरनेस क्रीममुले एका महिलेसह तिच्या मुलीवर जो प्रसंग ओढवला ते पाहून तुम्हीही म्हणाल आहे तशीच बरी आहे, पण ही फेअरनेस क्रीम नको गं बाई ! ही धक्कादायक घटना अकोला येथे घडली आहे. एका तरुण मुलीने फेअरनेस क्रीम वापरली. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून आई आणि बहिणीने तेच फेअरनेस क्रीम लावायला सुरवात केली. त्यातून पुढे धक्कादायक घटना घडली.
भाजप आमदार अतुल भातखळकर, मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या घटनेला वाचा फोडली. अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक कंपनीने बनविलेले फेअसरनेस क्रिमची ट्रीटमेंट एका ब्युटीशिअनने २० वर्षीय तरुणीवर केली. त्यामुळे तिचा चेहरा उजळला. ते पाहून तिची आई आणि बहीण यांनीही ती फेअसरनेस क्रिम वापरायला सुरवात केली.
काही दिवसांनंतर त्या तिघीनांही त्रास होऊ लागला. डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्यांना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. या आजारात किडनीतील लहान फिल्टर खराब होतात. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्या तिघींना केईएम रुग्णालयात आणण्यात आले.
फेअसरनेस क्रिममध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक
केईएममध्ये अधिक तपासणी केली असता हा आजार फेअसरनेस क्रिममुळे झाल्याचे समोर आले. त्या तिघी ज्या फेअरनेस क्रीम लावत होत्या त्यामध्ये पाऱ्याचा अतिरिक्त प्रमाणात वापर करण्यात आला होता. फेअसरनेस क्रिममध्ये १ पीपीएमपेक्षा पार्टस पर मिलियन कमी पाऱ्याचे प्रमाण असावे असा नियम आहे. पण. त्या तरुणींच्या फेअसरनेस क्रिममध्ये पाऱ्याचे प्रमाण सहा ते सातपट अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा ब्युटी पार्लरवर काय कारवाई करणार असा सवाल आमदार अतुल अतुल भातखळकर, मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विचारला.
सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त
मंत्री संजय राठोड यांनी सदर फेअरनेस क्रिमचे उत्पादन “अल हरमन व्हाईटनिंग क्रिम” नावाने मे. मेहेर ब्युटी पार्लर, मोमीनपुरा, अकोला येथे होत असल्याचे तपासात आढळून आल्याचे सांगितले.
सदर ब्युटी पार्लरमध्ये जप्त केलेल्या सौंदर्य प्रसाधनावर उत्पादन परवाना, उत्पादकाचे नाव, समूह क्रमांक, इतर आवश्यक तपशिल नव्हता. त्यामुळे औषध निरिक्षक, अकोला यांनी एकूण २९,५१५/- इतक्या किंमतीचा सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. तसेच, याचा तपास पूर्ण करुन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती दिली.