पायी दिंडी काढत वारकरी म्हणाले, सुषमा अंधारे ज्या पक्षात त्या पक्षाला आम्ही…नाशिकच्या वारकऱ्यांचा उद्धव ठाकरे यांना कोणता इशारा ?
राज्यात पुण्यानंतर नाशिकमध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाच्या वतिने दिंडी काढून विरोध करण्यात आला असून उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात नाशिकचे वारकरी देखील एकवटले आहे. वारकऱ्यांनी नाशिक शहरात पायी दिंडी काढत सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरापासून पायी दिंडी काढत सुषमा अंधारे यांच्या विधानावर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अभंग म्हणत सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांनी एकनाथ महाराज आणि नामदेव महाराज यांच्या विषयी संदर्भ देत असतांना काही चुकीचे संदर्भ दिले होते. याशिवाय रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार…आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं असं वादग्रस्त विधान केल्यानं वारकरी सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. पुण्यानंतर नाशिकमधील वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी माफी मागूनही त्यांना विरोध सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील वारकऱ्यांनी आणि महानुभाव पंथाच्या वतिने काळाराम मंदिर येथून दिंडी काढण्यात आली होती.
यानंतर रामकुंडावर वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथांच्या वतीने हातात पाणी घेत प्रार्थना करण्यात आली.
उद्धव साहेब सुषमा अंधारे यांची हकालपट्टी करा, गोदामाता अंधारेना सद्बुद्धी देवो, त्या ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला आम्ही वारकरी मतदान करणार नाही असंही वारकरी संप्रदायाच्या वतिने सांगण्यात आले आहे.
राज्यात पुण्यानंतर नाशिकमध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाच्या वतिने दिंडी काढून विरोध करण्यात आला असून उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यात आला आहे.
सुषमा अंधारे यांनी याच पार्श्वभूमीवर पुण्यात माफीही मागितली होती, त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या माफीनंतर विरोधाचे वातावरण कायम असल्याचे बघायला मिळत आहे.