मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची प्रगती अशी मोजली जाणार, आयजी ड्रोन कंपनीला मिळाले कंत्राट
आयजी ड्रोन कंपनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रगतीचे रेग्यूलर मॉनिटरींग अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे करणार आहे. या कामासाठी अंत्यत सोफिस्टीकेटेड सेंसर असलेल्या अत्याधुनिक ड्रोनचा वापर होणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून या प्रकल्पाच्या बांधकामाचे नियमित परीक्षणाचे वार्षिक कंत्राट देशातील आघाडीच्या ‘आयजी ड्रोन’ या कंपनीला मिळाले आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2026 पर्यंत सुरू करण्याची योजना आहे. अलिकडेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशाच्या पहिल्या 5G तंत्राच्या आयजी ड्रोन स्कायहॉकचे उद्घाटन केले आहे.
आयजी ड्रोन कंपनी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रगतीचे रेग्यूलर मॉनिटरींग आपल्या अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे करणार आहे. या कामासाठी अंत्यत सोफिस्टीकेटेड सेंसर असलेल्या अत्याधुनिक ड्रोनचा कंपनी वापर करणार आहे. या कामाासाठी कंपनी अत्याधुनिक ड्रोन विकसित केले असून त्याच्या आधुनिक सेंसरद्वारे जास्तीतजास्त तंतोतंत आणि अचूक डाटा जमा करणार आहे.
या ड्रोनद्वारे कन्स्ट्रक्शन साईटवरील हाय रिझोल्यूशन ईमेज आणि व्हिडीओ चित्रित केले जाणार आहेत. एका सॉफ्टवेअरद्वारे या ईमेज आणि व्हिडीओ आदी डाटाला एकत्र करून या प्रकल्पाच्या प्रगतीचा सखोल तांत्रिक आणि विश्षेलणात्मक आढावा घेता येणे शक्य होणार आहे. हा प्रगतीचा अहवाल पाहून सरकारी अधिकारी आणि वैधानिक यंत्रणांना निर्णय घेता येणे शक्य होणार आहे.
दोन तासात प्रवास होणार
मुंबई ते अहमदाबाद या 508 किमीच्या मार्गावर दर ताशी 350 किमी वेगाने बुलेट चालविण्याची योजना असून साबरमती ते बीकेसी हे अंतर दोन तासात कापले जाणार आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके असून 8 स्थानके गुजरातमध्ये तर 4 स्थानके महाराष्ट्रात आहेत.
हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्र सरकार तसेच संबंधित दोन राज्यांच्या एकत्रित सहभागाने जपानच्या सहकार्याने बांधला जात आहे. या प्रकल्पाचा खर्च 1.08 लाख कोटी रूपये इतका आहे.
अभिमानाचा क्षण
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्याचे महत्वाचे काम आमच्या कंपनीला मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे आम्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा एक भाग होणार असल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे असे आयजी ड्रोनचे सीईओ आणि संस्थापक बोधिसत्व संघप्रिय यांनी म्हटले आहे.