Ulhasnagar Wall Collapse : उल्हासनगरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, बैठ्या वस्तीतील नागरिकांच्या घरांचं नुकसान
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील वीर तानाजी नगरमध्ये आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहाची संरक्षक भिंत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मागच्या नाल्यात कोसळली. मात्र भिंतीचा काही भाग नाल्याला लागून असलेल्या बैठ्या घरांवरही पडल्यानं घरांची पडझड होऊन नुकसान झालं.
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसा (Rain)मुळे एका इमारतीची संरक्षक भिंत (Protective Wall) कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सोसायटीच्या बाजूला असलेल्या बैठ्या वस्तीतल्या काही घरांची पडझड झाली आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या सामानाचं नुकसान (Loss) झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत ढिगारा बाजूला केला. दाटीवाटीची वस्ती असल्याने जेसीबी मशिन घटनास्थळापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे हातानेच ढिगारा उचलावा लागला. या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.
शासकीय वसतिगृहाची संरक्षक भिंत कोसळली
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील वीर तानाजी नगरमध्ये आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहाची संरक्षक भिंत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मागच्या नाल्यात कोसळली. मात्र भिंतीचा काही भाग नाल्याला लागून असलेल्या बैठ्या घरांवरही पडल्यानं घरांची पडझड होऊन नुकसान झालं. तर अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं घरातल्या सामानाचं, वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं. दरम्यान, भिंत पडलेल्या ठिकाणी जेसीबी जाऊ शकत नसल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी हातानेच ढिगारा उचलला.
तहसीलदार कार्यालयासमोर कारवर झाड कोसळलं
ठाणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. उल्हासनगर शहरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे एकीकडे नदी नाले तुडुंब भरून वाहत असतानाच दुपारच्या सुमारास कॅम्प 5 च्या तहसीलदार कार्यालयासमोर असलेलं एक गुलमोहराचं झाड अचानक एका उभ्या असलेल्या कारवर कोसळलं. सुदैवाने यावेळी कारमध्ये कुणीही नसल्यानं कुणालाही इजा झाली नाही, मात्र या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं. या घटनेनंतर काही काळासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर विजेच्या तारा तुटल्यामुळे या भागातला वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. या घटनेची माहिती उल्हासनगरच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. (The protective wall of the government hostel in Ulhasnagar collapsed)