नाशिक : आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार (Rain) पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये (Nashik) तर अक्षरशः मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहे. इतकंच काय तर घरं कोसळून जीवित हानी देखील झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाने अक्षरशः कहर केल्याचे बोललं जात आहे. अशातच आता नाशिकहून मुंबईकडे (Mumbai) जाणारा महामार्ग देखील कसारा घाटात खचला आहे. दरवर्षी अशाच स्वरूपाचा रस्ता खचत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन असलेल्या मुख्य रस्त्यालाच तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 असलेल्या मुख्य महामर्गला अक्षरशः तडे गेले आहे.
कसारा घाटातील हा रस्ता खचण्याच्या मार्गावर असून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन वर्षापूर्वी हाच रस्ता पूर्ण खचला होता. आताही तीच परिस्थिती उद्भवली असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन नेमकं दोन वर्षांपासून काय करताय असा हा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे.
दरम्यान 10 ते 20 फूट खोल या भेगा असून ऐन दरीच्या तोंडावर असलेल्या रिटेनिंग वॉलला जोडून हा रस्ता खचल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईहून नाशिकला जाणारा कसारा घाटातील रस्ता 10 दिवस बंद करण्याचा निर्णय हायवे अथोरिटीनं घेतला असून काम प्रगतीपथावर आहे.
पावसामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.