मुंबई : 8 एप्रिल ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई (Mumbai) येथील घरावर एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने निलंबित केले होते. त्यावेळी त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे बाजू मांडण्याचे काम करीत होते. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयात देखील बाजू मांडत आले आहे. त्यातच शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने पुन्हा शासन सेवेत रुजू करून घेतले आहे. त्यानंतर या एसटी कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेत जल्लोष केला आहे. यावेळी ढोल-ताशावर एसटी कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता. कपाळी गुलाल लावत सदावर्ते यांना हार-पुष्प देत एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवहन मंडळाला शासनात विलीन करून घ्या या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते.
त्यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व वकील गुणरत्न सदावर्ते यांनी करत एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयात देखील बाजू मांडत लढा उभा केला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचारी आणि शासन यांच्यातील वाद हा अधिकच टोकाला गेला होता, त्याच दरम्यान शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती.
मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी जमले होते. त्यांनी त्यावेळी हल्ला केला होता.
त्याचवेळी राज्याचे परिवहन मंत्री यांनी या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती, तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.