आरोग्य यंत्रणा राम भरोसे? अंजनेरीच्या प्रकारावरुन रूपाली चाकणकर संतापल्या, काय आहे प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रताप समोर आल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने चर्चिला जात आहे.
नाशिक : नाशिकच्या आरोग्य विभागाचा ( Health Department ) गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला तिच्याच आईकडून प्रसूती करून घ्यावी लागली आहे. आरोग्य केंद्रात कोणीही उपस्थित नसल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या वतीने दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्याच्या आरोग्य विभागावर प्रश्न उपस्थित केले आहे. नाशिकच्या अंजनेरी येथील हा प्रकार संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारा ठरला आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात एक महिला आणि तिची आई प्रसूतीसाठी आल्या होत्या. मात्र, याठिकाणी डॉक्टर आणि नर्स नसल्याने महिलेच्या वृद्ध आईनेच मुलीची प्रसूती केली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलाही दुर्दैवी प्रकार घडला नाही.
मात्र, महिलेच्या प्रसूती दरम्यान काही प्रसंग ओढवला असता तर यास जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थि होऊ लागला आहे. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्याने महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दाखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे असे आदेश दिले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात असतांना राज्याच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर महिला आयोगाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निमित्ताने राज्यातील आरोग्य केंद्राच्या बाबतीतील गलथान कारभार समोर आला आहे.
नाशिक,जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.1/2@Maha_MahilaAyog @InfoNashik@SPNashikRural @nashikpolice pic.twitter.com/Us72US2cvl
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 5, 2023
दरम्यान बहुतांश आरोग्य अधिकारी हे निवासी अधिकारी असतांनाही आरोग्य केंद्राच्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक केंद्र हे चर्चेत आलेले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारानंतर आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
दरम्यान या नंतर निवासी आरोग्य अधिकारी असतांनाही जे आरोग्य अधिकारी राहत नाही, त्यांच्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी कर्तव्यात कसूर करून कारवाई करत नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल का अशीही चर्चा दबक्या आवाजात आता सुरू झाली आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी हे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर हॉस्पिटल थाटून बसलेले आहेत, त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा का करतात ? यामध्ये त्यांचे कसले हित आहे ? अशी उलटसुलट चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागली आहे.
अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या गलथान कारभारानंतर जिल्ह्यातील निवासी आरोग्य अधिकाऱ्यांचा मुद्दा समोर आला आहे. जे वैद्यकीय अधिकारी केंद्रस्थळी मुक्कामी राहत नाही त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी आता तरी कारवाई करतील का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.