रात्रीस खेळ चाले… नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार, ठाकरेंचे शिवसैनिक शिंदे गटात दाखल होणार, आज होणार प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज होणाऱ्या प्रवेशात माजी आमदार धनराज महाले, नाशिकच्या ग्रामीणचे पदाधिकारी, शहरातील माजी नगरसेवक यांचा प्रवेश होणार आहे.
नाशिक : शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, शिंदे-फडणवीस सरकार राज्यात विराजमान झाल्यानंतर ठाकरे गटातून 40 आमदार, 13 खासदार यांच्यासह पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटात दाखल होऊ लागले आहे. सुरुवातीच्या काळात शिंदे गटात नाशिकमधून पदाधिकाऱ्यांनी प्रवेश न केल्याने ठाकरे गटाचा नाशिक हा गड शाबूत राहिल्याचे बोलले जात होते. पण नाशिकमधून मनपाचे विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक यांनी प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले होते. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढू लागली आहे. त्यातच आता ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसणार आहे. 18 हून अधिक प्रवेश आज नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे. त्यासाठी नाशिकमधून नाशिक शहराचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे प्रवेशासाठी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज होणाऱ्या प्रवेशात माजी आमदार धनराज महाले, नाशिकच्या ग्रामीणचे पदाधिकारी, शहरातील माजी नगरसेवक यांचा प्रवेश होणार आहे.
नाशिक शहरातील माजी नगरसेवक यांच्याबरोबरच मनसेच्या माजी नगरसेवकाचा समावेश असून भुजबळ यांच्या जवळील पदाधिकारी तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेविकेचाही प्रवेश होणार आहे.
बाळसाहेबांची शिवसेना पक्षाचे नाशिकचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, नुकताच प्रवेश झालेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आजचे प्रवेश घडवून आणले आहे.
नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी दिली असल्याने त्यांनी संजय राऊत यांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.
येत्या काळात लवकरच माजी मंत्री आणि माजी आमदारांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत शिंदे गट दिसून येत आहे.