मुंबई– महाविकास आघाडीचे शिल्पकार अशी ज्यांची ओळख होती, शरद पवार (Sharad Pawar)आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यात संवाद निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारचं स्वपंन ज्यांनी प्रत्यक्षात आणलं, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणाचं आणि पंतप्रधानपदाचं स्वप्न ज्यांनी बघायला लावलं, गेल्या अडीच वर्षांत सातत्यानं महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे लढवत, भाजपाच्या तोफांना ज्यांच्या बुलंद तोफेने सातत्याने प्रतिहल्ले झेलावे लागले, ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आता अचानक सगळ्यांसाठी व्हिलन झाले आहेत. भाजपासाठी तर ते कधीपासून हिट लिस्टवर होतेच, मात्र आता बंडखोर एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या स्पष्ट आक्षेपानंतर आणि आता त्यांच्या एका ट्विटनंतर आता संजय राऊत सगळ्यांसाठीच हिरोचे व्हिलन झाले आहेत. महाविकास आघाडीच्या या अडीच वर्षांच्या काळात संजय राऊत यांनी दररोज महाविकास आघाडी सरकारची बाजू इतर कुठल्याही पक्षापेक्षा प्रखरपणे मांडली, विरोधकांवर तिखट शब्दांत हल्ले करत, त्यांनी विरोधकांचे वैर ओढवून घेतले. त्यातून ईडीसारख्या यंत्रणांनाही त्यांना सोमोरे जावे लागेल, मात्र तरीही न डगमगणारे संजय राऊत आता मात्र एकदम सर्व बाजूंनी नकारात्मक टीकेला सामोरे जाताना दिसत आहेत. काय आहेत याची प्रमुख कारणे जाणून घेऊयात.
शिवसेनेचे परंपरागत शत्रू असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर काँग्रेस यांच्याशी आघाडीचा घाट सुरुवातीपासून सजय राऊत यांनी घातला. ऑक्टोबर २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर सुमारे राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यात संवादच न झाल्याने सरकार स्थापनेला उशीर झाला. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना सरकार स्थापन करु शकते, याची चर्चा सुरुवातीला संजय राऊत यांनी सुरु केली. काँग्रेसला सोबत घेण्याची बोलणीही पवारांच्या मार्फत संजय राऊत यांनीच घडवून आणली. त्यातून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्याचे शिल्पकार म्हणून संजय राऊत यांना त्यांचे श्रेय मिळाले. पक्षातील अनेक जुन्या नेत्यांना आणि भाजपातील अनेक धुरिणांना संजय राऊत यांनी केलेली ही खेळी आवडली नाही. परंपरागत हिंदुत्वाची कास सोडून, विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी जवळीक आणि त्याचे जाहीर, बिनतोड समर्थन यामुळे संजय राऊतांबाबत तेव्हापासूनच शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या आणि विरोधकांच्या मनात अढी निर्माण झाली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून संजय राऊत यांची शरद पवारांशी असलेली जवळीक ही वादाचा विषय ठरली. राज्यसभा खासदार असलेले संजय राऊत यांचे गेल्या काही वर्षात दिल्लीत शरद पवार यांच्याशी चांगला संपर्क निर्माण झाला. नेहमीच दिल्लीवारीत त्यांची आणि पवारांची भेट होत असे. यातून अनेकदा त्यांच्यावर आरोपही झाले. संजय राऊत हे शिवसेनेचा खासदार असले तरी काम मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी करतात, असा आरोप सातत्याने करण्यात आला. नारायण राणे यांनी तर पवारांचे नोकर अशीही उपमा आरोप करताना अनेकदा दिली. यातून संजय राऊत यांच्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
महाविकास आघाडीचे सरकार स्थान झाल्यापासून, अनेक प्रकरणात पक्षाची जाहीर भूमिका हे सातत्याने संजय राऊत हेच मांडत होते. अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेच्या घोषणा, विरोधकांच्या टीकेवरच्या भूमिका या संजय राऊत मांडत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच भूमिका संजय राऊत मांडत असले, तरी अनेकदा त्यांची काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली. त्यात राम मंदिर, हिंदुत्व, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, छत्रपतींबाबतची वक्तव्ये, पंतप्रधान मोदींच्या विरोधातील वक्तव्ये, भाजपा नेत्यांवर खालच्या भाषेत केलेली टीका, यातून संजय राऊत यांची प्रतिमा शिवसेनेत अधिक उजळ झाली. संजय राऊतांच्या भूमिकेप्रमाणेच सरकार चालवत असल्याचा भास निर्माण झाला. यातून पक्षांतर्गत आणि विरोधकांत त्यांच्याबाबत इर्षा आणि संताप अधिक तीव्र होत गेला. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी, छत्रपती संभाजीराजे यांनी पहिल्यांदा पक्षप्रवेश करावा आणि मगच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका पहिल्यांदा राऊत यांनी मांडली होती. अशा अनेक प्रसंगात त्यांच्या भूमिका या सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक राहिल्या.
संजय राऊत हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. सामनाच्या अग्रलेखातील धारदार भाषा हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे ते सातत्त्याने माध्यमांत प्रिय राहिले. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांनी विरोधकांचे शत्रूत्व ओढवून घेतले. त्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, खसदार उदयनराजे, राज ठाकरे, नारायण राणे यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश राहिला. किरिट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंब आणि राऊत यांच्यावर केलेल्या आरोपानंतंर आणि नंतरच्या ईडीच्या प्रकरणातही अनेक शिवसेना आमदार शांत असले, बोलत नसले, तरी संजय राऊत मात्र सातत्याने प्रतिक्रिया देत भूमिका मांडत राहिले, यातून त्यांच्याविरोधात जनमानसात आणि विरोधकांतही रोष उत्पन्न झाला. कोरोना काळात तर ते दररोज माध्यमांत दिसत होते. यातून त्यांचे पक्षात महत्त्व वाढले, मात्र सार्वजनिक पातळीवरही त्यांच्याबाबत रोष व्यक्त होत गेला.
सत्तेत असेपर्यंत दररोज हे सुरु होतंच. यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना बोलण्याची संधी मिळाली, मात्र एकनाथ शिंदेंना ही संधी मिळाली नाही. मध्यंतरीच्या राज्यसभेच्या निवडणुकातही शिवसेनेकडून सभा घेण्यासाठी राऊत यांना कोल्हापुरात पाठवण्यात आले. यातूनच त्यांचे पक्षातील स्थान हे उद्धव ठाकरेंच्या खालोखाल झाल्याचे दिसत होते. अशा स्थितीत ते माध्यमात जे बोलतात ते वेगळे आणि प्रत्यक्षात वागतात, ते वेगळे अशी तक्रार एकनाथ शिंदेंनी करुन त्यांच्याबाबतची नाराजीच व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांतही संजय राऊत यांच्या वाढत्या प्रस्थाबाबत नाराजी होती. ती स्पष्ट शब्दांत व्यक्त होत नसली, तरी राऊतांबाबत अनेकांच्या मनात अढी होतीच. आत्ताच्या त्यांच्या विधानसभा बरखास्तीच्या ट्विटनंतर, आता हा संताप स्पष्ट शब्दांत व्यक्त होऊ लागला आहे.