अजित पवार यांचं वादग्रस्त विधान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील कुणाचं मौन? आत्तापर्यंत कुणी-कुणी दिली प्रतिक्रिया?
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विधानसभेत केलेल्या दाव्यावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी मौन बाळगले आहे, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अजित पवार यांच्या एका दाव्याने चांगलेच तापलेलं आहे. अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बोलत असतांना छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर कधीच नव्हते ते स्वराज्यप्रमुख होते असा दावा केला होता. हिवाळी अधिवेशन सुरू असतांना शेवटकच्या दिवशी अजित पवार यांनी आपल्या भाषणात हे विधान केले होते. त्यावरून संपूर्ण राज्यभरात विरोधकांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून हल्लाबोल केला आहे. ठिकठिकाणी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी जोडो मारो आंदोलन करत अजित पवार यांचा निषेध नोंदविला आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार यांचे विधानाशी सहमत आहे की नाही याबाबतचा सुद्धा खुलासा केला नाही. अजित पवार यांनी केलेल्या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी केलेले विधान वगळता याबाबत कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे पहिल्या फळीतील कोणत्याही नेत्याने याबाबत विधान न केल्याने किंवा प्रतिक्रिया न दिल्याने अजित पवार यांच्या विधानाशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सहमत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानाचे समर्थक करतांना अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड हेच दोन आमदार दिसून आले आहे.
त्यामध्ये स्वतः जितेंद्र आव्हाड यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संभाजीराजे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक होते यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असतांना राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते गप्प असल्याचे चित्र असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांनीही यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
विशेष म्हणजे अजित पवार यांना मानणारा असलेला वर्ग आणि त्यातील काही आमदारांनी देखील यावर गप्पच राहणंच पसंत केले आहे.
विरोधक अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक होत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका नेमकी काय यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.