रामदास भाईंसारखा संत माणूस नाही; नीलम गोऱ्हे यांच्याकडून रामदास कदम यांची स्तुती
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज पुरंदरला होत्या. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला. रामदास कदम हे संत माणूस आहेत, असं गौरवोद्गार नीलम गोऱ्हे यांनी काढलं. त्या जाहीर मेळाव्यात बोलत होत्या.
विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 9 डिसेंबर 2023 : रामदास भाईंसारखा संत माणूस नाही, असे गौरवोद्गार काढतानाच रामदास कदम यांना जो केबिनमध्ये भेटायला यायचा तो त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसायचा. त्यानंतर हे पाहून मला माझ्या केबिनमध्ये कुणाला भेटायला बोलवायची भीती वाटायची, असं शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यावेळी त्यांनी विजय शिवतारे यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
पुण्यातल्या सासवडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्या दरम्यान नूतन सभासद नोंदणी आणि पदनियुक्ती पत्रवाटप करण्यात आलं. यावेळी पुरंदर – हवेली तालुक्यातले शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला शिवसेना नेते रामदास कदम, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आणि शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती वाघमारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी रामदास कदम यांची स्तुती केली.
आपणही बाळासाहेबांचे लाडके
विधानसभा आणि विधानपरिषदचे अधिवेशन चालू असताना देखील, वेळ काढून पुरंदर तालुक्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी मी याठिकाणी आले आहे. मध्यंतरी सरकारकडून मला बंगला देण्यात आला, त्याच नाव पुरंदर आहे. त्यामुळं मी पुरंदर कसं विसरेल? पुण्याचं राजकारण सोप्प वाटतं, पण खरं तर इथं कधी कुणाची युती होईल आणि कोण कधी कोणाला पाडेल हे सांगता येतं नाही. आपल्याकडे शिवसेनेचे चिन्ह आहे. आपणही बाळासाहेबांचे लाडके होतो. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र होते म्हूणन तेच त्यांचे लाडके होते, असं नाही. आपणही त्यांचे लाडके होतो, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
बोलायला खूप आहे, पण…
प्रश्न घेऊन भेटायला गेलं की, भेटायला आलेल्यांच्या प्रश्नांपेक्षा तो कधी जाणारं याकडेचं जास्त लक्ष असायचं. त्यामुळं भेटायला जाऊन काय उपयोग? ज्या प्रश्नसाठी गेलो तो प्रश्न सुटणार नसेल तर जाऊन कायं उपयोग? बोलायला खूप आहे पण, असं म्हणत गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
लोकांपर्यंत काम पोहोचवा
मला मुबंईत 7-8 वर्षापूर्वी एक नेता भेटला होता. त्याला मी विचारलं तुम्ही 4-5 वर्ष कुठं दिसत नाही. मग निवडून कसं येता? त्यांनी सांगितलं निवडणुकीपूर्वी मतदार यादी आली कि आम्ही ती घेतो. त्या नावांमध्ये असलेली कट्टर शिवसैनिकांची नावं आम्ही खोडून टाकतो आणि उरलेल्या बाकीच्यांना जाऊन भेटतो. पैसे वाटतो. त्यांनी हे सिक्रेट सांगितलं. त्यामुळं आपण केलेले कामं लोकांपर्यंत पोहचवणं खूप महत्त्वाचे आहे, असंही त्या म्हणाल्या