अखेर ठरलं? महाविकास आघाडीतील दोन पक्षांचं ठरलं; किती जागा लढणार?; आकडा आला समोर
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. तर निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये आणि प्रचाराला अधिक वेळ मिळावा म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी मित्र पक्षांसोबत जागा वाटपावर चर्चा करताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीवर फोकस केला आहे. जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याने आघाडीने आताच जागा वाटप करून निवडणुकीच्या कामाला लागण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील दोन पक्षांचं जागा वाटपाचं सूत्रही ठरल्याचं सांगण्यात आलं. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने दोघांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीतील दोन पक्षांच अखेर ठरलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा काँग्रेस पक्षाची उरली आहे. काँग्रेस किती जागा लढवणार आणि ठाकरे, पवार गटाचं सूत्र मान्य करणार का? हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला जाणार नाही. निकालानंतरच मुख्यमंत्रीपद जाहीर केले जाणार असल्याचं आघाडीत घटत असल्याचं सांगण्यात आलं.
तेच आमचं सूत्र
दरम्यान, ठाकरे गटानेही जागा वाटपाबाबतचा स्वतंत्र फॉर्म्युला तयार केल्याची चर्चा आहे. पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आमचा कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही. ही चुकीची माहिती आहे. आम्ही 288 जागांचा ॲक्सेसमेंट करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील 288 जागांवर चाचपणी करत आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा 288 जागांचा अभ्यास करतेय. तिघांचाही हा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू, की कोणी कुठे किती जागा लढवायच्या. जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल, असं आमचं सूत्र आहे. लोकसभेलाही हेच सूत्र होतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
99 टक्के जागा लढवणार
दरम्यान, काँग्रेस नेते, आमदार अभिजीत वंजारी यांनी विदर्भातील जागांवर दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे. निरिक्षकांकडून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभानिहाय आढावा घेण्यात आला. पूर्व विदर्भातील 99 टक्के जागा लढण्यावर या बैठकीत एकमत झालं. पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद आहे. त्यामुळे आमचा वाटा मोठा असला पाहिजे. आम्ही हा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत, असं अभिजीत वंजारी यांनी सांगितलं. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचीरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेचा यावेळी आढावा घेण्यात आला.
त्या चार जागा हव्यात
लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटप करताना काँग्रेसने मोठी भूमिका पार पाडली. शरद पवार साहेबांच्या आग्रहानुसार वर्धेची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. त्यामुळे अमर काळे काँग्रेसचे असले तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट घेतले आणि सगळे त्यांच्या पाठीशी होते. त्यामुळेच काळे यांना मोठा विजय मिळवता आला. आता अमर काळे यांच्याशी समन्वय करून चारही विधानसभा काँग्रेस पक्षाला द्याव्या अशी आग्रही भूमिका सर्वांची राहणार आहे. चारही विधानसभा मिळतील अशी अपेक्षा आहे, असंही वंजारी म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे स्पर्धा राहणार नसर्गिक आहे. जोपर्यंत वाटाघाटी अंतिम होत नाही, तोपर्यंत अशी चर्चा राहणार आहे. पण विदर्भातील या चारही जागा मागण्यासाठी आग्रही भूमिका राहणार आहे. काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष आहे. काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काँग्रेस नंबर एकचा पक्ष असल्याने त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अधिकाधक जागा मिळाव्यात, अशी आग्रही भूमिका राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.