त्यांना क्षत्रिय मराठ्यांची गरज नाही का? मनोज जरांगे पाटील यांची कुणावर टीका?
आता आमच्या लक्षात आलंय की तुम्ही आमचे नाहीत. तुम्ही आम्हाला आपलं मानत नाहीत. म्हणून तुम्ही आमच्या दारात येऊ नका. आम्ही तुमच्या दारात येणार नाही. काय कारण आहे? विषय संपला, असा अखेरचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
अंतरवली सराठी, जालना : 26 ऑक्टोबर 2023 | मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पाणीही सोडलं. आता सरकारनं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्षत्रिय मराठ्यांची गरज नाही का? असा सवालही त्यांनी केलाय. कितीही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर मोडणार नाही. सरकारला जाहीर विनंती करुन सांगतो, असे आंदोलन मोडण्याचे प्रयोग आता तुम्ही करू नका. असे प्रयोग सरकारला परवडणार नाहीत, असा इशारा पाटील यांनी सरकारला दिला.
तुम्ही येऊ नका. विषय संपला
आंदोलन शांततेत हाताळा. काहीही प्रयोग करू नका. शहाणे व्हा, आंदोलन गांभीर्यानं घ्या. कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय माघार नाही, असा एल्गार जरांगे पाटील यांनी पुकारला. आता गावागावात साखळी उपोषण सुरू होणार. आता आमच्या लक्षात आलंय की तुम्ही आमचे नाहीत. तुम्ही आम्हाला आपलं मानत नाहीत. म्हणून तुम्ही आमच्या दारात येऊ नका. आम्ही तुमच्या दारात येणार नाही. काय कारण आहे? तुमच्या आमच्या गावात यायचं. अजिबात तुम्ही येऊ नका. विषय संपला, असा अखेरचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा
इकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदींच्या शिर्डी दौऱ्यावर बोट ठेवलंय. शिर्डीत पंतप्रधान मोदी येऊन गेले. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहे. त्यांचं स्वागत आहे. पण पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा ही विनंती आहे असे ठाकरे म्हणाले.
सत्ता घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे
एकनाथ शिंद यांनी शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार अशी शपथ घेतली. शपथ जरूर घ्या पण मग तुमच्याकडे मार्ग काय तो नीट समजून सांगा. शपथ घेणं हा एक भावनिक प्रकार झाला. पण, शपथ घेऊन वेळ काढणं हा मार्ग नाही. आम्हाला बोलवू नका. जरांगे पाटलांना बोलवा. मराठा समाजाचे जे सगळे लढवय्ये नेते आहेत त्यांना बोलवा. त्यांच्याशी बोला, मार्ग दाखवा. सत्ता घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झालात? अशी बोचरी टीकाही ठकारे यांनी केलीय.
हाच मुद्दा धरून जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीय. मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर चकार शब्दही काढला नाही. म्हणजे त्यांना क्षत्रिय मराठ्यांची गरज नाही असाच त्याचा अर्थ होतो. त्यांना आता गोरगरिबांची गरज नाही राहिली, असं जरांगे पाटील म्हणाले. तर, दुसरीकडे आरक्षण पदरी पडेपर्यंत उपोषण सोडणार नाही यावर जरांगे पाटीलही ठाम आहेत.