माझी शेवटची निवडणूक, मला विजयी करा : सुशीलकुमार शिंदे
सोलापूर: “यापुढे कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मला निवडून द्या” असे भावनिक आवाहन करत सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपला राजकीय संन्यास जाहीर केला. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरुध्द भाजपकडून डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात […]
सोलापूर: “यापुढे कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मला निवडून द्या” असे भावनिक आवाहन करत सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपला राजकीय संन्यास जाहीर केला. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरुध्द भाजपकडून डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोलापुरातील जाहीर सभेत सुशीलकुमार शिंदेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर खरपूस टीका केली. शिंदे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित आघाडीच्या माध्यमातून एमआयएम या कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर गेलेत. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्युलॅरिझमचा खून केला आहे. तर जातपात न मानणाऱ्या सीपीएमने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर हे भाजपने उभे केलेले पिल्लू असून, ते सर्वधर्मसमभावाचे वोट कटवा आहेत. मतांच्या विभागणीसाठी प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.”
वाचा : सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. ही अनपेक्षित भेट असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर
या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर तुफान टीका केली होती. “काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. भेटीचे राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं. निवडणूक म्हणजे दुश्मनी असं मी कधीच मानलं नाही. कुणाला तरी भेटायचे आणि फोटो व्हायरल करायचे, हे काँग्रेसचे डावपेच आहेत.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
माझी शेवटची निवडणूक – सुशीलकुमार
माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.
सोलापुरात काँटे की टक्कर
2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.
संबंधित बातम्या
प्रचार पॅटर्न : एक दिवस सुशीलकुमार शिंदेंसोबत!
आम्हाला गाढव म्हणण्यासारखी आमची संस्कृती नाही : सुशीलकुमार शिंदे
‘वंचित’ने भाजपची सुपारी घेतली, सुशीलकुमार शिंदेंचा हल्लाबोल
अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे
सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!