‘या’ भाज्या तुम्ही ओळखल्या का? आदिवासी कुटुंबांसाठी ठरत आहेत वरदान

| Updated on: Jun 30, 2024 | 6:15 PM

पावसाळ्यात हाताला काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत. रानभाज्यांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आदिवासी कुटुंबे रान भाज्यांच्या विक्रीकडे वळत आहेत.

या भाज्या तुम्ही ओळखल्या का? आदिवासी कुटुंबांसाठी ठरत आहेत वरदान
Follow us on

उद्योगधंद्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध नसल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडल्याने अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असलेल्या ग्रामीण भागातील आदिवासींना रानमेव्याच्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग सापडला आहे. भातशेतीच्या कामातून वेळ काढत कुटुंबाचा रहाटगाडा हाकण्यासाठी पावसाळ्यात जंगलात उगवणारी शेवळी, करडू, कोळी भाजी, बांबूची शिन, माटभाजी, दिंडे आणि खापरा सारख्या रानभाज्यांची विक्री केली जात आहे. रानभाज्यांचसोबतच गावरान कोंबडे, चिंबोऱ्या आणि खेकडे विक्रीतून आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पालघर तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे जाणारे आणि महामार्गालगत बसून रानभाज्यांची विक्री केली जात आहे. कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्यासाठी लहानगे सुट्टीच्या दिवशी रानमेव्याच्या विक्रीसाठी पालकांना मदत करताना दिसून येत आहेत.

पावसाळ्यात हाताला काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत. रानभाज्यांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आदिवासी कुटुंबे रान भाज्यांच्या विक्रीकडे वळत आहेत. मान्सुन बरसण्यास सुरुवात होताच जंगलात रान भाज्या उगवण्यास सुरुवात होते. रान भाज्यांबाबत उत्तम ज्ञान आणि कष्ट करण्याची तयारी असल्याले ग्रामीण भागातील आदिवासी बांधव जंगल पालथे घालून रानभाज्या शोधून आणतात.

रानभाज्यांना पसंती का?

आदिवासी बहुल ग्रामीण भागात रस्त्यालगत, लगतची बाजारपेठ आणि महामार्गालगत रानभाज्या मुबलक प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. आरोग्यवर्धक आणि चवीला रुचकर असलेल्या रानभाज्यांना पर्यटक आणि शहरी ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला रानभाज्या विक्रीतून आदिवासींना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

जंगलात उगवणाऱ्या शेवळी, कोली भाजी, खापरा माटभाजी, बांबूची शिंद, टाकला, करडू सारख्या रानभाज्या रस्त्यालगत आणि बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. रस्त्यालगत विक्रीला बसलेल्या महिलांच्या रानभाज्यांना शहरी ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. वरई-पारगाव रस्त्यावर गुंदावे गावच्या हद्दीत आठवड्याचे शेवटचे दोन दिवस रानभाज्यांच्या विक्रीला जोर चढतो. वरई पारगाव रस्त्यावरून केळवे समुद्र किनाऱ्याकडे जाणारे पर्यटक, सफाळे आणि पालघरच्या दिशेने जाणारे शासकीय अधिकारी, कार चालक आणि गृहिणी रस्त्यालगत बसलेल्या आदिवासी महिलांकडून रानभाज्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला नेहमीच्या वापरातील भाज्यांची आवक काहीशी कमी झालेली असल्याने ग्राहकांची रानभाज्यांना पसंती मिळते.

आदिवासी विक्रेत्यांना किती पैसे मिळतात?

खत आणि कीटकनाशकांचा अंश नसलेल्या नैसर्गिक रानभाज्या आदिवासी जंगलातून शोधून आणल्यानंतर भाज्या वेचून त्यांच्या जुड्या बांधल्या जातात. शनिवार आणि रविवारच्या दिवशी रस्त्यालगत विक्रीला ठेवल्या जातात. दिवसभराच्या विक्रीतून साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपये मिळत असल्याची माहिती एका विक्रेत्या महिलेने दिली.

रान भाज्यांचे विक्रीचे दर किती?

  • कोलीभाजी – ₹15 जुडी
  • करडू – ₹15 जुडी
  • शेवली – ₹ 25 जुडी
  • दिंडे – ₹15 जुडी
  • खापरा – ₹15 जुडी
  • शिन – ₹20 वाटा
  • करवंद – ₹10 वाटा
  • टाकला – ₹10 जुडी

आदिवासींना रानभाज्यांच्या विक्रीसाठी स्टॉलची मागणी

वरई;पारगाव रस्त्यालगत विक्रीला ठेवलेल्या रानभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. रानभाज्यांसोबत घरात पाळलेले गावरान कोंबडे, आणि ओहोळात मिळणाऱ्या चिंबोऱ्या (खेकडे) विक्रीसाठी ठेवले जात आहेत. वरई पारगाव रस्त्यावरील गुंदावे गावच्या हद्दीत असलेल्या वळणाजवळच्या रस्त्यालगत रानभाज्यांच्या विक्रीसाठी आदिवासी महिला बसतात. भाजी खरेदी करणारे ग्राहक त्यांची वाहने रस्त्यावर पार्क करून उतरत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे वनविभागाच्या जागेत आदिवासींना रानभाज्यांच्या विक्रीसाठी स्टॉल बांधून देण्याची मागणी पुढे येत आहे.