Nagpur : नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू; एक जखमी
नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे.
नागपूर : विदर्भात पाऊस (Rain) सुरूच आहे. मान्सून (Monsoon Update) सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत अनेकांना पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक दुर्दैवी बातमी नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर जिल्ह्यातून समोर येत आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत जीवती तालुक्यात शेडवाही शिवारात वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस हद्दीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उज्वला थुटूरकर असे या महिलेचे नाव आहे. यंदा या दोनही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
भद्रावती तालुक्यातील शहरालगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने त्याचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. संजय काशिनाथ चालखुरे वय 55 असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर वीज पडल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव विकास डाखरे वय 22 असे आहे. हे दोघेही चीचोर्डी शेत शिवारामध्ये गुरे चारत होते. याचवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यातच अंगावर वीज कोसळल्याने संजय चालखुरे यांचा मृत्यू झाला. तर विकास डाखरे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अन्य घटनेत दोघांचा मृत्यू
दुसरीकडे जीवती तालुक्यात शेडवाही शिवारातही अशीच एक घटना घडली आहे. वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस हद्दीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उज्वला थुटूरकर असे या महिलेचे नाव आहे. वीज पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. यंदा देखील पावसाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत अनेकांना वीजेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.