शरद मोहोळ हत्येच्या मुख्य म्होरक्याचा थरारक पाठलाग, गणेश मारणे याच्या अशा आवळल्या मुसक्या…
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या तीन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. गणेश मारणे हा अनेक दिवसापासून फरार होता. गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पुणे | 31 जानेवारी 2024 : पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या तीन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. गणेश मारणे हा अनेक दिवसापासून फरार होता. पण, त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी नाशिक रोड येथून गणेश मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याच्यासह विठ्ठल शेलार आणि आणखी 16 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक केली आहे. मोहोळ याची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपास चक्रे हाती घेत सात जणांना अटक केली होती. नंतर 15 जानेवारी रोजी आणखी 10 जणांना पनवेल आणि वाशी येथून अटक केली होती.
शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या संशयाची सुई गुंड मुन्ना पोळेकर याच्याकडे वळविली होती. मात्र, पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्यानुसर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठिकठिकाणी सापळे रचून 20 हून अधिक जणांना अटक केली. मात्र, मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या.
हे आहेत सह आरोपी
शरद मोहोळ हत्येप्रकरणी पोलीसानी आतापर्यंत 24 जणांन अटक केली आहे. यामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय वटकर, आदित्य गोळे, संतोष कुरपे, नामदेव कानगुडे, अमित ऊर्फ अमर कानगुडे, सतीश शेडगे, नितीन खैरे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांचा समावेश आहे.
नवीन माहिती समोर येण्याची शक्यता
शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची एक महिना आधी बैठक झाली होती. याचवेळी मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार असल्याने पोल्कीसांचा पुढील तपास काही काळ मंदावल होता. परंतु, आता गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.