छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षासाठी भारतात आणणार, महाराष्ट्रात वाघनखं ‘या’ दिवशी पोहोचणार

| Updated on: Sep 30, 2023 | 2:28 PM

अफजल खान याचा कोथळा काढताना ज्या वाघनखांची चर्चा होते, ती शिवरायांची वाघनखं ३ वर्षांसाठी भारतात आणणार, महाराष्ट्राच्या भूमीत या दिवशी पोहोचणार वाघनखं. ही वाघनखं महाराष्ट्राचा श्रीमंत इतिहास, पराक्रमाची साक्षीदार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षासाठी भारतात आणणार, महाराष्ट्रात वाघनखं या दिवशी पोहोचणार
wagh nakh
Follow us on

मुंबई : स्वराज्याची निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनके पराक्रम केले. यापैकीच एक आहे अफजल खानाचा वध. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या अफजल खानाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता. या वाघनखांच्या सहाय्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमामुळे स्वराज्यावरच एक मोठ संकट दूर झालं होतं. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला संपवण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, त्या बद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ही वाघनखं ब्रिटीनच्या ताब्यात आहेत. पण आता लवकरच सर्वसामान्यांचा या वाघनखाचं दर्शन घेता येणार आहे.

देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला संपवण्यासाठी जी वाघनखं वापरली, ती येत्या 16 नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार होणार आहे. पुढील तीन वर्षासाठी ही वाघनखे भारतात असणार आहेत. सांस्कृतिक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालय 3 वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्र सरकारला देण्यास तयार झालं आहे. महाराष्ट्रातील चार प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, नागपूरमधील केंद्रीय संग्रहालय आणि कोल्हापूरचा लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी या वाघनखांच दर्शन घेता येईल. ही वाघनखं महाराष्ट्राचा श्रीमंत इतिहास, पराक्रमाची साक्षीदार आहेत.

वाघनखांसाठी बनवलेल्या समितीमध्ये कोण-कोण?

ही वाघनखं सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी व त्याच्या प्रदर्शनासाठी राज्य सरकारने 11 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सांस्कृतीक विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे या समितीचे प्रमुख असतील. वरिष्ठ नोकरशाह आणि पोलीस अधिकाऱ्यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. मुंबई, नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस महासंचालक या समितीमध्ये आहेत. ही वाघनखं कशी आणायची, प्रदर्शनात कशा पद्धतीने मांडायची याच नियोजन ही समिती करेल. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या 3 ऑक्टोबरला ब्रिटनला जाणार आहेत. त्यावेळी व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालयासोबत करार होईल.
.