आजची रात्र आहे, आरक्षण जाहीर करा, नाही तर या तारखेपासून आमरण उपोषण; मनोज जरांगे याची मोठी घोषणा
आम्हाला आरक्षण द्या. तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नसल्याचे मनोज जरांगे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देताना म्हटले आहे.
राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु झाला असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.आजची रात्र तुमच्याकडे शिल्लक आहे. नाही तर 20 तारखेपासून पु्न्हा उपोषण सुरु करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. आम्ही सर्व मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील निर्णय घेणार नाही. ते पुढे म्हणाले की आजची रात्र सरकारच्या हातात आहे आम्ही सर्व मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही. मी थेट विषयाला हात घालणार आहे. आपण आता दमलोय असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
उद्या दुपारी रिंगण सोहळ्याला जाणार
जरांगे यांची शांतता रॅलीचा 13 जुलै रोजी समारोप झाला आम्ही आता दुसरा टप्पा नंतर जाहीर करु असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही दिलेल्या ९ मागण्या पूर्ण करा. त्या गैबण्याच्या छगन भुजबळांच्या नादी लागू नका. त्याच्या नादी लागून तुमचा पक्ष बंद पडेल आणि सत्ताही जाईल. त्यामुळे भुजबळ यांच्या नादी लागू नका असाही इशारा त्यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की मी उद्या दुपारी रिंगण सोहळ्यासाठी माऊलीच्या दर्शनाला सोलापूर- वाकरीला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हा पहिल्या टप्प्याचा समारोप आहे
मला उद्या दुपारी 12 वाजता जायचे आहे. पहिल्या टप्प्याचा हा समारोप आहे. हाच पहिला टप्पा एवढा मोठा झाला आहे. मुंबईत गेल्यावर कसं होईल? शिंदे साहेब, फडणवीस साहेब हे लोक मुंबईला येऊ शकतात. तुमची बंदूक फंदूक काहीच करणार नाही या मराठ्याच्या वादळापुढे असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
सरकारच्या हाती आजची रात्र आहे, आमचा अंत पाहू नका…
मराठ्यांनो शांत राहा. मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो. संभाजीनगरात आलात. तसंच शांततेनं जायचं आहे. कुठे काडीही मोडली नाही पाहिजे. सरकारने आज रात्रीपर्यंत विचार करा. मी उद्याच निर्णय घेणार होतो. संभाजी नगरातच निर्णय घेणार होतो. उद्याच्या उद्या निर्णय होणार होता. पण उद्या दुपारी मला माऊलीच्या दर्शनाला जायचं असल्याचे त्यांनी सांगितले.मी 16 तारखेला परत येणार आहे. 17 तारखेला माझ्या हस्ते श्रीक्षेत्र नारायण गडावर विठू रायाची पूजा ठेवली आहे. त्यामुळे 17 तारीख गेली. आता 18 आणि 19 तारीखच माझ्या हाती आहे. मला राजकारणात जायचं नाही. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं आहे. आम्हाला आरक्षण द्या. तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
288 उमेदवार पाडायचे की नाही ते …
आम्हाला आज रात्री आरक्षण दिलं नाही तर 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. मेलो तरी चालेल. पण मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळणार आहे. 20 तारखेला स्थगित केलेलं उपोषण सुरू होणार आहे.20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभं कारायचे की पाडायचे याची तारीख जाहीर करू. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी करतोय की मला सरकारला संधी द्यायची आहे. मुंबईला जायचं नाही. सरकार सुधारलं तर सुधारलं. नाही तर उमेदवार पाडणार असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.