प्रवाशांनो लक्ष द्या, मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या गॅन्ट्रीसाठी ब्लॉक, पाहा वाहतूकीत काय झाला बदल?
यशवंतराव चव्हाण मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी उद्या दुपारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाची यादी वाहतूक विभागाने जारी केली आहे. ती खालील प्रमाणे आहे.
मुंबई : मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या मंगळवार दि.28 मे रोजी गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवासाला निघताना ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत कि.मी 1.550 येथे मुंबई ते पुणे ( पुणेकडे जाणा-या वाहिनीवर ) गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दि. 28 मे 2024 रोजी दुपारी 12.00 वा ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या महत्वाच्या कामामुळे मंगळवारी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत वाहनांना द्रुतगती महामार्गावर हलक्या आणि अवजड वाहनांना संपूर्णपणे बंदी असणार आहे.
मुंबई ते पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत थ्री लेग सर्विसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे.
काय आहे पर्यायी मार्ग
1. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवरील ( मुंबईहुन पुण्याकडे ) जाणारी हलकी वाहने ही कळंबोली कि.मी. 00.000 येथून होते डावे बाजुस वळवून कळंबोली सर्कल वरुन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.48 या मार्गावरुन मार्गस्थ करता येतील.
2.यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर ( मुंबईहुन पुण्याकडे ) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कळंबोली की.मी.00.000 येथून डावे बाजूस वळवून कळंबोली सर्कलवरुन कळंबोली-डी-पाँईट – करंजाडे – पळस्पे आणि पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.48 या मार्गावरुन मार्गस्थ करता येतील.
3. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर ( मुंबईहुन पुण्याकडे ) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कोन ब्रिजवरुन वळवून घेवून कि.मी. 09.800 येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.
4. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर ( मुंबईहुन पुण्याकडे ) जाणारी सर्व प्रकारची वाहने राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन पुढे जाऊन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पाँईट कि.मी.42.000 येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.