चंदन पुजाधिकारी, नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मात्र, मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. या घटनेनंतर मंदिर समितीने तक्रार दाखल केली होती. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.
मंगळवारी काय झाले अपडेट
त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून घुसण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी पुरोहित संघ तसेच काही ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच मंदिर परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.
काय म्हणाले शेखर
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले की, यासंपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहोत. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी मंदिराचे सुरक्षा रक्षकांसह 5 ते 7 जणांची चौकशी केली जात आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी माहिती समोर येईल. आरोपींचा असे कृत्य करण्यामागे काय उद्देश होता, हे तपासानंतरच कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिर तसेच मंदिराच्या कार्यालयात येऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. घडलेल्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजची त्यांनी पाहणी केली. गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणात कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत.
काय आहे नेमका प्रकार
त्र्यंबकेश्वर मंदिरात 2 दिवसांपूर्वी इतर धर्मिय काही युवकांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला मंदिर प्रशासनाने विरोध केला होता. दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील उत्तर दरवाजाच्या ठिकाणी काही युवक आले होते. त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. दोन दिवसांनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.