महिनाभरातच रस्त्याचं पितळ उघडे, रस्ता खचल्याने ट्रक अडकला…
शहरात निकृष्ट दर्जाचे काम समोर येत असल्याने रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांना मनपा आयुक्त काळ्या यादीत टाकणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
नाशिक : कधीकाळी नाशिकचे (Nashik) रस्ते राज्यात दर्जेदार रस्ते (Road) म्हणून ओळखले जायचे. मात्र आता नाशिकचे रस्ते वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत येत आहे. जुने नाशिक भागातून मालवाहतूक ट्रक (Truck) जात होता. त्याचवेळी ट्रकची चाक थेट रस्ता खचून आतमध्ये अडकून पडला होता. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी नाशिकच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. नाशिकच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त आहेत. याशिवाय मागील आठवड्यात रस्ता खचल्याने चार ते पाच फुटाचे मोठे खड्डे पडले होते. आता जुने नाशिक परिसरात रस्ता खचल्याचे समोर आले आहे.
जुने नाशिक भागातील सुमन चंद्र शाळेसमोरील रस्त्यावर मालवाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केल्यानंतर रस्ताच खचून गेलाचे समोर आले आहे.
पुढील चाक जमिनीत गेल्याने खड्ड्यात ट्रक अडकून पडला होता. पाण्याची पाईपलाईन च्या दुरुस्ती साठी रस्ता खोदण्यात आला होता.
त्यानंतर नवीन सिमेंट रस्ता बनविण्यात आला होता. मात्र, एक महिना उलटताच रस्ता खचला गेला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मात्र, यापूर्वी महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.
मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी शहराचा आढावा घेतल्यानंतर कंत्राटदार दर्जेदार काम करीत नाहीत, असा निष्कर्ष काढला होता.
शहरात निकृष्ट दर्जाचे काम समोर येत असल्याने रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांना आयुक्त काळ्या यादीत टाकणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.